नांदेड- शहरातील आयटीआय चौक भागात ५० खोके आणि १०५ डोके अशा आशयाचे बॅनर शुक्रवारी झळकले होते. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली असून गृह विभागानेही त्याची तात्काळ घेतली. त्यानंतर महापालिकेने तासाभरातच हे बॅनर काढून घेतले. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता विद्रुपण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बॅनर लावणारा भाजपाचा तो निष्ठावंत कोण? याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बॅनर युद्ध पेटले आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी नांदेडातही उमटले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आयटीआय चौकात ५० खोके आणि १०५ डोके या आशयासह देवेंद्र फडणवीस समर्थक असा मजकूर असलेले बॅनर झळकले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. गृह विभागाने तात्काळ दखल घेवून प्रशासनाला हे बॅनर काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर तासाभरातच हे बॅनर काढण्यात आले. त्यानंतर याप्रकरणात कर निरिक्षक राहूलसिंह चौधरी यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु हे बॅनर नेमके लावले कोणी? हे अद्याप समजले नाही. पोलिसांकडून भाजपाच्या त्या निष्ठावंताचा शोध घेण्यात येत आहे.
गृह विभागाने घेतली झाडाझडतीशहरात आयटीआय चौकात बॅनर झळकल्यानंतर काही वेळातच गृह विभागाने त्याची दखल घेतली. त्यानंतर मनपा प्रशासनाची झाडाझडती घेण्यात आली. त्यामुळे तासाभरातच हे बॅनर काढून ठाण्यात तक्रार देण्यात आली. प्रत्यक्षात नांदेड शहरात विनापरवाना कुणीही उठतो अन् बॅनर लावतो. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. या प्रकारापासून तरी मनपाने अनधिकृतपणे लावण्यात येणार्या बॅनरच्या बाबतीत कठोर भूमिका घेण्याचा बोध घ्यावा.