- युनूस नदाफ (पार्डी जि. नांदेड)
अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी मागील चार वर्षांपासून फुलशेती करून हमखास रोखीचे उत्पन्न मिळवीत आहेत़ वर्षातील बाराही महिने फुलशेती करून आपला उदरनिर्वाह भागवीत आहेत़ फुलशेतीमधून शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवीत आहेत़
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत चालल्याने शेतीतील वार्षिक उत्पन्न कमी होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत राहिले़ शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळत आहेत़ हा तालुका केळी, हळद, सोयाबीनसाठी प्रसिद्ध असून, केळी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने केळीचे उत्पादन कमी झाले, तसेच या वर्षात दुष्काळ परिस्थितीतून केळीला वाचविले; परंतु भाव कमी मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ त्यामुळे मागील चार वर्षांपासून शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत़
येथील शेतकरी इतर पिकांबरोबरच फुलशेती करीत आहेत़ यामुळे रोजच्या रोज शेतकऱ्यांना रोखीचे पैसे मिळत आहेत़ येथे मोठ्या प्रमाणावर गुलाब, झेंडू व मोगरा या जातीच्या फुलांची लागवड करण्यात येत आहे़ येथील शेतकरी माधवराव कवडे यांच्या शेतात बाराही महिने फुले असतात़ त्यांनी या वर्षात एक एकरमध्ये झेंडू, गुलाब फुलांची लागवड केली आहे़ यासाठी त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केला आहे़ त्यांचा मुलगा दररोज फुले घेऊन शहरातील फुलबाजारामध्ये फुलांची विक्री करतात़ येथे त्याच्या फुलाला भरपूर भाव मिळतो़ यातून सर्व खर्च जाऊन त्यांना १,५०० ते २,००० रुपये मिळतात़
माधवराव कवडे यांच्याकडे सहा एकर जमीन असून, त्यांनी वीस गुंठ्यात गुलाब, नेटसेटमध्ये तीस गुंठे गुलाब व एक एकरमध्ये झेंडू लागवड केली आहे़ त्यासाठी त्यांना तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला असून, दररोज १,५०० ते २,००० रुपये उत्पन्न होत आहे़ त्यांनी आपल्या शेतात फुलशेतीसाठी सिंगल फेजची जोडणी केली़ कारण की थ्री फेजची लाईट ८ तास मिळते़ त्यामुळे त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून सिंगल फेजची जोडणी केली आहे़ त्याचबरोबर फुलशेतीत ठिबक सिंचनाने पाणी देण्यात येते़ त्यामुळे पाण्याची व वेळेची बचत होत आहे़ उन्हाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर फुलांना पाणी लागते़ त्यामुळे ठिबक संचाचा वापर करण्यात आले आहे़
मी गेल्या चार वर्षांपासून फुलशेती करीत आहे़ मला फुलापासून चांगले उत्पन्न मिळत आहे़ त्यामुळे केळी व हळद हे पिके कमी केली आहेत़ उन्हाळ्यात फुलांची मागणी जास्त असते़ त्यामुळे भरपूर पैसा मिळतो, असे शेतकरी माधवराव कवडे यांनी सांगितले. नापिकीला आत्महत्येचा पर्याय असू शकत नाही, असे ते म्हणाले.