बिलोली (नांदेड ) : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे़ यापूर्वी जात पडताळणी समितीकडे वैधतेसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पावती किंवा सहा महिन्यांचे हमीपत्र चालणार नाही़ त्याचप्रमाणे नामांकन अर्जप्रक्रिया पारंपरिक (आॅफलाईन) प्रमाणे होणार होते, मात्र २ फेब्रुवारी रोजी सुधारित आदेश आले असून नामांकन अर्ज संगणकीय (आॅनलाईन) पद्धतीने घेतले जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली़ परिणामी नव्या आदेशाने आरक्षित जागेवरील उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे़
२२ जानेवारीच्या राज्य निवडणूक आदेशान्वये ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या सरपंच व सदस्यांकरिता पोटनिवडणूक होत आहे़ निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारीपासून नामांकन प्रक्रिया तर २७ रोजी मतमोजणी निश्चित केली़ आता अनुसूचित जमाती (एस़टी़), अनुसूचित जाती (एस़सी़) तसेच इतर मागासवर्ग (ओबीसी) या आरक्षित जागेवरील उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र अत्यावश्यक केले आहे़ ६ महिन्यांच्या हमीपत्राची पद्धत बंद करण्यात आली़ त्यामुळे सरपंच अथवा सदस्यासाठी असलेल्या जागेसाठी जातवैधता प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. बहुसंख्य जागेसाठी या आरक्षित पदासाठी उमेदवारच मिळाले नसल्याने पोटनिवडणूक होत आहे़
हमीपत्रावरच वर्ष उलटले़बिलोली तालुक्यातील कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा डॉ़अरुणा कुडमुलवार तर बिलोली पंचायत समितीच्या सभापती भाग्यश्री अनपलवार या पदाधिकार्यांकडे अद्याप वैधता प्रमाणपत्र नाही़ दरम्यान, मुन्नेरकापू व महादेव कोळी या जात प्रमाणपत्रावर दोन्हीही पदाधिकारी वर्षभरापूर्वी निवडून आले़ सहा महिन्यांचे हमीपत्र देवूनही अद्याप वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही़ मुन्नेरकापू ही जात तेलंगणात ओबीसी असून याच प्रमाणपत्राच्या आधारे डॉक़ुडमुलवार कुंडलवाडी येथे निवडून आल्या़ तर अटकळी गणातून भाग्यश्री अनपलवार महादेव कोळी जात प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत़