डोळे मोठे करुन पाहिल्याने हल्ला
डोळे मोठे करुन पाहिले म्हणून एका शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना ८ मे रोजी कनिराम नाईक तांडा येथे घडली. लोहा तालुक्यातील कनिराम नाईक तांडा येथे वसंत रावसाहेब राठोड हे थांबलेले असताना तू माझ्याकडे डोळे मोठे करुन का पाहिले म्हणून आरोपीने त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर कुऱ्हाड आणि रॉडने त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणात सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जुन्या भांडणाच्या कारणावरुन डोके फोडले
जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद घालत एकाचे डोके फोडण्यात आले. हदगांव तालुक्यातील मौजे खरटवाडी येथे ही घटना घडली. दिलीप रघुनाथराव पुंजरवाड यांच्याशी आरोपीने वाद घातला. त्यानंतर दगडाने त्यांचे डोके फोडले. या प्रकरणात मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
व्यापाऱ्याची १३ लाखांची केली फसवणूक
नांदेड- नांदेडातून मुंबई येथे हिरवी मिरची पाठविल्यानंतर अर्धीच रक्कम व्यापाऱ्याला देत उर्वरित रक्कम देण्यास नकार देत फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धनेगाव येथे अंकुश दिगांबर माने यांची गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी आहे. त्यांच्याकडे मुंबईच्या आर.एन. एक्सपोर्टने हिरवी मिरचीची ऑर्डर दिली होती. त्यानुसार गुरुकृपा ट्रेडिंग कंपनीने शेतकऱ्यांकडून हिरवी मिरची खरेदी करुन ७० टन ९८१ किलो मिरची पाठविली. पाठविलेला हा माल २१ लाख ८० हजार ६२९ रुपयांचा होता. त्यानंतर आर. एन. एक्सपोर्टने गुरुकृपा ट्रेडिंग कंपनीच्या नावे ८ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश दिला. परंतु उर्वरित १२ लाख ९० हजार ६२९ रुपये देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. माने यांना कंपनीने दिलेले सहा धनादेश अनादरीत झाले. त्यामुळे संशय आल्याने माने यांनी मुंबई येथे कंपनीचे कार्यालय गाठले. या ठिकाणी त्यांनी पैशाची मागणी केली असता, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात माने यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सपोउपनि कुंडगीर हे करीत आहेत.