बालाजी पेडगे यांना पीएच. डी.
नांदेड : येथील ग्रामीण तंत्रनिकेतनमधील प्रा. बालाजी पेडगे यांना स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने गणित विषयात पीएच. डी. प्रदान केली आहे. पेडगे यांनी डॉ. दिलीप पालीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली समरिमार्केबल वर्क इन रॅनडम डिफ्रन्सियल इक्लुयूझन ॲण्ड इट्स ॲप्लिकेशन हा शोधन प्रबंध सादर केला.
जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला
नांदेड : जिल्ह्यात किनवट आणि हिमायतनगर येथे दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. किनवटच्या साईनगर येथे नरसिंग तक्कलवाड यांनी घरासमोर (एमएच २६ ए ५८१६) या नंबरची दुचाकी उभी केली होती. २५ हजार रुपयांची ही दुचाकी लंपास करण्यात आली. हिमायतनगर तालुक्यातील रुक्मिणीनगर येथे डॉ. देविदास गायकवाड यांची (एमएच २६ बीबी ५२९०) ही दुचाकी लांबविण्यात आली. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
गुरुवार बाजारातून मोबाईल लंपास
नांदेड : शहरातील सिडको भागात भरणाऱ्या गुरुवार बाजारातून चोरट्याने मोबाईल लंपास केला. ही घटना ११ मार्च रोजी घडली. कोंडिबा शंकर इंगोले हे भाजीपाला खरेदी करीत असताना चोरट्याने त्यांना धक्का देऊन शर्टच्या वरच्या खिशातील साडेअकरा हजार रुपयांचा मोबाईल लांबविला. या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
नांदेड : इजळी ते मुगट जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना १० मार्च रोजी घडली. या प्रकरणात मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
साहेबराव बालाजी राजमोरे (रा. पाथरड, ता. मुदखेड) हे रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास (एमएच २६ बीटी ९२५१) या क्रमांकाच्या दुचाकीवरून इजळी ते मुगट जात होते. यावेळी मागाहून येणाऱ्या भरधाव वेगातील वाहनाने सूर्य पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकी धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजमोरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात संभाजी राजमोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.