ट्रॅक्टरच्या धडकेने चिमुकल्याचा मृत्यू
नांदेड : अर्धापूर तालुक्यातील मौजे लोणी घरासमोर खेळत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना १३ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रामराव चांदू भालेराव यांचा नातू ऋतुराज पिराजी वाघाडे हालोणी येथे घरासमोरील अंगणात खेळत होता. त्याच वेळी माल खाली करण्यासाठी निघालेल्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने ऋतुराजला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोउपनि आगलावे हे करीत आहेत.
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना कंधार तालुक्यातील मौजे कुरुळा येथे घडली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने, पीडितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास पोना.जुनगरे हे करीत आहेत.
सावरगावात जुगार अड्ड्यावर धाड
माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे सावरगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. १३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी साडेसोळा हजार रुपये जप्त केले असून, या प्रकरणात माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला, तर मौजे बामणी शिवारात आणखी एका अड्ड्यावर धाड टाकून दुचाकी आणि रोख रक्कम असा ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.