मूल होत नसल्याने विवाहितेचा छळ
नांदेड : मूलबाळ होत नसल्याने दवाखान्यात उपचारासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना उमरी तालुक्यातील बळेगाव येथे घडली. मागणी पूर्ण होत नसल्याने पीडितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात सादका बेगम सय्यद पाशा, सय्यद पाशा सय्यद सदर, सय्यद गौस सय्यद खाजा, सय्यद ताजोद्दीन सय्यद खाजा आणि सय्यद आशी सय्यद जैनुद्दीन यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
घरामागे दडविली देशी दारू
नांदेड : धर्माबाद तालुक्यातील मौजे येताळा येथे अवैधपणे विक्रीसाठी घराच्या पाठीमागे देशी दारू दडविण्यात आली होती. साडेसात हजार रुपयांची ही दारू पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई २ मार्च रोजी करण्यात आली. या प्रकरणात हुशन्ना बन्नाळीकर या आरोपीविरोधात धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
दारू विक्री करणारी महिला पसार
नांदेड : धर्माबाद तालुक्यातील करखेली रस्त्यावर अवैधपणे शिंदी विक्री करणारी महिला पोलीस दिसताच पसार झाली. ही घटना २ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी महिलेजवळील शिंदीची शंभर पाकिटे जप्त केली. या प्रकरणात धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
दोन जुगार अड्ड्यांवर धाडी
नांदेड : तामसा आणि रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या. यावेळी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तामसा शहरातील आठवडी बाजारात कल्याण नावाचा मटका सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून १७ हजार रुपये जप्त केले, तर मौजे डोंगरगाव शिवारात तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून चार हजार रुपये जप्त केले.