कंधार : शहरातील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा नवा पॅटर्न अंगीकारला असल्याचे समोर आले आहे. दहावी व बारावीच्या आगामी परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहेत. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेतून गुणवत्ता साकारली जाणार असून, कॉपीबहाद्दरांना मात्र आपोआपच चाप बसणार आहे.तालुक्यात जि. प. व राज्य शासनाच्या खाजगी शाळांची संख्या ३०० पेक्षा अधिक आहे. ग्रामीण भागात जि.प.प्राथमिक शाळांचे मोठे शैक्षणिक जाळे आहे. शैक्षणिक गुणवत्तेचा पाया ग्रामीण भागात भक्कम करण्यात या शाळांचे मोठे योगदान असते. ११० शाळांनी डिजिटल सुविधा निर्माण करून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न चालविले आहेत.मनोविकास शाळेने गुणवत्ता वाढीचा प्रयत्न सुरू केले. इयत्ता ५ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सुमारे १ हजार ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व गुणवत्तावाढीचा ध्यास घेतला. वेतनेत्तर अनुदानातून सुमारे १ लाख ७५ हजार खर्च ‘सीसीटीव्ही’वर केला आणि २८ वर्गखोल्या निगराणीखाली आल्या. वर्गातील अध्ययन-अध्यापन, शिस्त आपोआप या टप्प्यात आली आणि शाळा शहरात चर्चेत आली. मुख्याध्यापक कंठीराम पा. लुंगारे, एन.व्ही.बंडेवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा संकल्प पूर्ण झाला. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मीकांत मुखेडकर, अॅड. बाबूराव पुलकुंडवार, लक्ष्मीकांत मामडे, अॅड. अनिल कोळनूरकर, लक्ष्मीकांत गंजेवार, विकास बिडवई, गणेश महाजन आदींचे सहकार्य मिळाले. २१ फेब्रुवारीपासून बारावी व ७ मार्च पासून दहावीच्या परीक्षा सरू होत आहेत. मनोविकास शाळा ही या परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रातील परीक्षा सीसीटीव्ही निगराणीत होणार आहेत. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षेचा मार्ग मोकळा होणार आहे.यामुळे कॉपीबहाद्दरांना आता चाप बसणार आहे. कॉपीबहाद्दरांची पंचाईत होणार असली तरी अभ्यासू विद्यार्थ्यांना ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.
या शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा शाळा शिस्त, अध्ययनाला प्रभावी चालना देण्यास मदतीची राहील. तसेच १० व १२ परीक्षा परीक्षा कॉपीमुक्त होण्यास उपयुक्त ठरणार आहे.तालुक्यातील शाळेतील परीक्षा केंद्रांनी अशी सुविधा उपलब्ध केल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास उपयुक्त ठरेल. त्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाला आहे- सतीश व्यवहारे, गटशिक्षणाधिकारी, कंधारशाळेतील शिस्त अबाधित राहण्यासाठी, मुख्याध्यापक कक्षात तासिकेचे निरीक्षण करणे,अध्ययन -अध्यापन व्यवस्थित होते की नाही, याचे अवलोकन करणे सोयीचे झाले.१० वी १२ परीक्षेत कॉपीला आळा बसण्यास यामुळे मदत मिळणार आहे- कंठीराम लुंगारे,मुख्याध्यापक मनोविकास शाळा,कंधार.