अर्धापूर ( नांदेड ) : तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक बैल पोळा सणासह ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. आधुनिक काळात दिवसेंदिवस बैलांची संख्या घटत आहे. तर यंत्र शेती परवडत असल्याने आधुनिकीकरणाच्या या युगात यंत्राचे दिवस येत आहेत. त्याचप्रमाणे पिंपळगाव म. येथील या ट्रॅक्टर पोळा मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे.
शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावुन दिवसभर उन्हातान्हात राबणाऱ्या बैलांप्रती कृज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण दिवसेंदिवस बैलांची, सर्जा - राजांची संख्या घटत असल्याने त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. पोळा सणाच्या दिवशी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील शेतकऱ्यांनी व ट्रॅक्टर मालकांनी सर्जा राजासह आधुनिक सोबती झालेल्या ट्रॅक्टरची मिरवणूक मोठ्या थाटात काढली. यावेळी ट्रॅक्टरला फुले, रिबीन, फुगे आदींचा वापर करत सजवण्यात आले होते. बैलांच्या पाठोपाठ ट्रॅक्टरची ही मिरवणुक गावातली प्रमुख देवस्थान हनुमान मंदीरासह गावातुन काढण्यात आली. यावेळी ट्रॅक्टर मालकांनी आपली ट्रॅक्टर सजवुन या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
दिवसेंदिवस तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण होत असल्याने शेती कामासाठी शेती क्षेत्रात बैलां ऐवजी अनेक शेतकरी ट्रॅक्टरच वापरतात. म्हणूनच पोळा सणाला जसे शेतकरी आपल्या बैलं जोडीला सजावट करतो. त्याप्रमाणे आपले ट्रॅक्टर देखिल पोळ्याच्या दिवशी धुवून सजावट करुन या सणाला द्विगुणि करीत आहेत. पण दिवसेंदिवस लुप्त होत चाललेला पोळा सण व सर्जा राजाची जोडी ही फक्त पुस्तकात व छायाचित्रात पाहण्यासारखी वेळ पुढील काळात येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. आधुनिक यंत्र घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळत आहे. यामुळे पुढील काळ आधुनिक यंत्राचाच येऊ शकतो.
सर्जा राजासह सालगडी पध्दत लुप्त
दरवर्षी गुढीपाडव्याला शेतातील कामे करण्यासाठी सालगडी ठेवण्याची पद्धत आहे. पोळा सणाच्या दिवशी सालगड्यास नवीन पोशाख घेण्यात येतो पण आधुनिक काळात सालगड्यासह सर्जा राजाही आता लुप्त होत आहे.
नवाट्रेंड ट्रॅक्टरचाही होतोय पोळा
सर्जा राजासाठी लागणारा चारा आदी गोष्टी खर्चिक होत असल्याने व आधुनिक काळात मशीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणे परवडत असल्याने ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे त्यामुळे पोळा सणानिमित्त ग्रामीण भागात नवाट्रेंड येत असून ट्रॅक्टरचाही पोळा होत आहे.