नांदेड: सगळीकडे सध्या नव वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असताना चोरट्यांनी मात्र थर्टी फर्स्टपूर्वीच सेलिब्रेशन केले आहे़ शहरात चोरीच्या तीन घटनांमध्ये ५ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला़ एवढे दिवस शांत असलेल्या भाग्यनगर हद्दीत आता पुन्हा एकदा चोर्यांचे सत्र सुरु झाले आहे़
एकेकाळी जिल्ह्यात चोरी आणि लुटमारीच्या घटनांसाठी अव्वल असलेले भाग्यनगर पोलीस ठाणे गेल्या सहा महिन्यांपासून मात्र शांत होते़ पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करीत अनेक टोळ्यांचा बंदोबस्त केला होता़ सहा महिन्यात जवळपास ५० आरोपींच्या मुसक्या आवळत ६० लाखांवर मुद्देमाल जप्त केला होता़ परंतु आता पुन्हा एकदा या भागात चोरट्यांनी डोके वर काढले आहे़ दोन दिवसापूर्वीच हातातून मोबाईल पळविल्याची घटना घडली होती़ त्यानंतर गुरुवारी नंदकिशोर नगर येथे सायंकाळच्या सुमारास चोरट्यांनी घरात शिरुन सोन्या-चांदीच्या दागिन्यासह ४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ सविता उत्तमराव नरवाडे या गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या़ तर मुलगा ज्ञानेश्वर हा खाजगी शिकवणीसाठी गेला होता़ नरवाडे यांचे पती धर्माबाद येथे मूकबधीर विद्यालयात अधीक्षक आहेत़
याच संधीचा लाभ घेत चोरट्याने खिडकीच्या ग्रील वाकवून आत प्रवेश केला़ यावेळी चोरट्यांनी मुख्य दरवाजा आतून बंद केला होता़ कपाटातील दागिने आणि रोकड त्यांनी लांबविली़ त्यामध्ये सोन्याचे गंठण, नेकलेस, झुमके, चैन, कर्णफूल, मिनीगंठण, चैन, पाटल्या, बांगड्या यांचा समावेश होता़ सविता नरवाडे या खरेदीवरुन परत आल्यानंतर त्यांना घरातील लाईट सुरु दिसले़ त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला़ परंतु तो आतून बंद होता़ मागील दरवाजाने आत गेल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला़ याप्रकरणी त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़
त्याचबरोबर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत़ भरदिवसा चोरट्यांनी घरातून ७२ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली़ विशेष म्हणजे यावेळी कुटुंबातील सदस्य घरातच होते़ महम्मद रफिक महम्मद खाजा या चालकाचे पीरबु-हाणनगर येथे घर आहे़ सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरातील सदस्य इतर कामात व्यस्त असताना, पाठीमागील दरवाजाने चोरटा आत आला़ यावेळी चोरट्याने कपाटात ठेवलेले ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ अन्य एका घटनेत लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकाची पैशाची बॅग चोरट्याने लांबविल्याची घटना घडली़ लक्ष्मीकांत भीमराव परळकर हे २४ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास नमस्कार चौक ते महाराणा प्रताप चौक जाणार्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेले असताना, चोरट्याने त्यांना धक्का देऊन त्यांच्या हातातील बॅग लंपास केली़ या बॅगमध्ये लॅपटॉप, मोबाईल असा एकूण २५ हजार रुपयांचा माल होता़ याप्रकरणी लक्ष्मीकांत आरळीकर यांनी तक्रार दिली़