उड्डाण पुलाचे काम संथगतीने
भोकर - शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाचे काम संथगतीने होत असल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.कामाला गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. रेल्वे विभागातर्फे हा पूल बांधण्यात येत असून संबंधित कंत्राटदार व अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते. पालकमंत्र्यांनीही या संदर्भात संबंधितांचे लक्ष वेधले. मात्र कामाला गती आली नाही.
गंठण चोरले
कंधार - तालुक्यातील श्रीगनवाडी येथील महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली. सदर महिला सायंकाळी बाथरुममध्ये गेली होती. यावेळी तेथेच बसलेला आरोपी सचिन याने महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे गंठण लांबविले. कंधार पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला आहे.
मिठाई वाटून जल्लोष
नांदेड - मनपाने सातवा वेतन आयोग लागू केल्याने सिडको क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला. यावेळी सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, लिपिक नागेश येताळे, प्रभू गिराम, दीपक पाटील, सुधीर बैस, राहुल चौधरी, सुदाम थोरात, राजपालसिंग जक्रीवाले, मारोती सारंग, व्यंकट गायकवाड, मारोती चव्हाण, प्रशांत चावरे, संतोष भदरगे, राजरत्न जोंधळे, मुक्ताबाई धर्मेकर आदी उपस्थित होते.
कार्याध्यक्षपदी रापते
नांदेड - भारतीय पिछडा ओबीसी संघटनेच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी राजेश रापते यांची निवड झाली. राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी.माचनवार, विभागीय उपाध्यक्ष गोविंद सिरसाटे, जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदीप राठोड, महासचिव राजेश चिटकुलवार यांनी रापते यांच्या नियुक्तीचे स्वागत केले.
दारूड्यांचा वावर
किनवट - किनवट येथील रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात दारूड्यांचा वावर वाढला आहे. दारूड्यांमुळे मुंबई ते आदिलाबाद जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. रेल्वे पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलणे आवश्यक आहे. रेल्वे स्थानकात दारू अड्डा बनविण्यात आला. जागाेजागी मद्यप्राशन करीत बसलेले दारूडे आढळतात. प्रवाशांनी तक्रारी करूनही रेल्वे विभागाने दखल घेतली नाही.
अवैध वाळू उत्खनन
माहूर - तालुक्यातील पडसा घाटावरून अवैध दारू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील कोणत्याच घाटांचा लिलाव झालेला नसताना बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने वाढीव दरात वाळूचा पुरवठा होत आहे. वाईबाजार, सारखणी, वानोळासह अनेक ठिकाणी वाळू पाठविली जाते.
रेल्वे गाड्या सुरू करा
किनवट - किनवटमार्गे येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे गाड्या गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. जिल्ह्याचे ठिकाण नांदेड व औरंगाबाद जाण्यासाठी किनवटमार्गे आदिलाबाद, तिरुपती, नांदेड अशी उत्सव रेल्वे सुरू करावी अशी मागणी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष उमाकांत कऱ्हाळे पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. सध्या नांदेड-किनवट मार्गावर केवळ नंदीग्राम एक्सप्रेस सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी उपरोक्त रेल्वे सुरू करण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली.