- विशाल सोनटक्के
नांदेड : इंग्लंडने एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे लसीकरण उरकले. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मास्क काढून टाकला आहे. म्हणजेच लसीकरणावर विश्वास दाखविला आहे. आपल्याकडे मात्र सगळी गोंधळाची स्थिती आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकारचे नियोजन जबाबदार असल्याचा आरोप करीत महाराष्ट्राने यापूर्वीही लसीकरणासारख्या मोहिमा यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला केवळ डोस द्यावेत. लसीकरणाचे पूर्ण नियोजन करून ही मोहीम आम्ही यशस्वी करू, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ते मंगळवारी ‘लोकमत’शी बोलत होते.
४५ वर्षांच्या पुढच्या नागरिकांना लस देण्याचे नियोजन केंद्र शासनाने केले. पहिला आणि दुसरा डोस कुणाला आणि कधी द्यायचा? याचे अधिकारही केंद्रालाच आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. मात्र, ही मोहीम राबविताना केंद्र सरकार अद्यापही गंभीर नसल्याचे? दिसते. सध्याच्या संकटावर मात करायची असेल तर जितक्या लवकर लसीकरण पूर्ण होईल तितके चांगले आहे. मात्र, आज मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही. या मोहिमेमध्ये अनेक त्रुटी आहेत. लसीकरणासाठी केंद्राने ॲप तयार केला आहे. या ॲपमध्ये कुणी कुठूनही नाव नोंदवू शकतो. माझ्या जिल्ह्यातील घुलेवाडी गावात ४०० डोस आले होते. लसीकरणासाठी ४०० जणांनी नोंदणीही केली. यातील तब्बल १८० लोक हे बाहेर जिल्ह्यातील होते.
शेजारच्या नाशिक, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणी केली असेल, हे एकवेळेस समजू शकतो. मात्र पार परभणीपासून हैदराबादपर्यंतचे नागरिक नोंदणी करून लसीकरणासाठी घुलेवाडीत येत असतील तर सिस्टीम म्हणून हे योग्य आहे का? असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला. असे अनेक मुद्दे आहेत. तथापि, केंद्र सरकार ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही. लसीकरणासाठी महाराष्ट्राचे सर्व्हे करू द्या, अशी मागणी दोनवेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे. मात्र अद्यापही केंद्राकडून त्यास प्रतिसाद दिला नसल्याचे? थोरात यांनी सांगितले.
दोन भावाच्या भांडणात पाहुण्याला आणू नकामागील अनेक वर्षांपासून नांदेड, लातूर विभागीय महसूल कार्यालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता अशा वादाच्या विषयावर बसून चर्चा करावी लागेल. नांदेड आणि लातूर हे दोन जिल्हे एकमेकांचे भाऊ आहेत. या दोन भावांच्या वादात मला पाहुण्याला का आणता? अशी मिश्कील टिप्पणी करीत थोरात यांनी या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्याचे टाळले.
महाराष्ट्रात कुठेही आकड्यांची लपवालपवी नाहीपहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केल्यानंतरही राज्य शासन गांभीर्याने कोरोनाला सामोरे जात होते. मात्र नागरिकच कुठे तरी थोडे बिनधास्त झाले होते. त्यामुळेच दुसरी लाट आल्याचे सांगत, या लाटेचाही महाराष्ट्र शासन गंभीरपणे सामना करीत आहे. आम्ही आकड्यांच्या बाबतीत कुठेही लपवालपवी केली नाही. महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांनी आज भाजपशासित राज्यात मृत्यूचे कसे तांडव सुरू आहे याकडेही पाहावे, असे थोरात म्हणाले.