काँग्रेस-शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:24 AM2019-07-07T00:24:03+5:302019-07-07T00:25:39+5:30
विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ परंतु अंतर्गत बंडाळीमुळे हा किल्ला भेदून येथे सेनेने २० वर्षे सत्ता भोगली़ येणाऱ्या निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे़
सुनील चौरे ।
हदगाव : विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ परंतु अंतर्गत बंडाळीमुळे हा किल्ला भेदून येथे सेनेने २० वर्षे सत्ता भोगली़ येणाऱ्या निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे़ काँग्रेस पक्षाप्रमाणे शिवसेनेतही दोन गट झाल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून या विभाजनाचा फायदा वंचित आघाडीला होईल का? अन्यथा यंदाही सेना फायद्यात राहील़
सुरुवातीपासून या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचेच उमेदवार विजयी झाले़ निवृत्ती पाटील जवळगावकर, जयवंतराव पाटील वायफनेकर व बापूराव आष्टीकर या तीन घराण्यांभोवतीच मतदारसंघ फिरला़ या तिन्ही घराण्याला भेदून १९९५ साली शिवसेना पक्षाचे सुभाष वानखेडे विजयी झाले़ त्यांना तीन टर्म मिळाल्या़ बापूराव पाटील आष्टीकर १० वर्षे काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिले़ सूर्यकांता पाटील ५ वर्षे होत्या़ २००४ मध्ये नवा चेहरा म्हणून माधवराव पाटील जवळगावकर यांना काँग्रेसने तिकीट दिले़ परंतु त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला़ सन २००९ मध्ये त्यांनी झालेल्या पराभवाचा वचपा काढीत ७० हजार मतांनी सुभाष वानखेडे यांना पराभूत केले़ त्यावेळी अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होणार होते़ त्यामुळे मतांचे विभाजन न करता जनतेने त्यांना भरपूर मतदान केले़
परंतु २००४ मध्ये त्यांचा पराभव झाल्यामुळे सन २००९ मध्ये नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली होती़ परंतु त्यांना नकार दिल्याने त्यांनी सेनेत प्रवेश केला़ २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे जवळगावकर यांचा पराभव केला़ २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांनी त्यांच्याविरूद्ध काम करण्याचा निर्णय घेतला़ तेही तिकिटाचे दावेदार आहेत़ पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष लढविण्याची त्यांची तयारी आहे़ त्यामुळे सेनेच्या मताचे विभाजन होण्याची शक्यता आहे़ काँग्रेस पक्षाकडून गंगाधर पाटील चाभरेकर व माधवराव पाटील जवळगावकर हे दावेदार आहेत़ जवळगावकर यांना दोनदा उमेदवारी मिळाली आहे़ यामध्ये एकदा विजय तर एकदा पराभव झाला़ जि़ प़ अध्यक्षपद त्यांच्या मातोश्रीला दिल्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांना डावलून इतरांना तिकीट देणार असल्याचीही चर्चा आहे़
जुने अन् नव्यांचा संघर्ष
भाजपाकडून माजी राज्यमंत्री सूर्यकांता पाटील या रिंगणात उतरू शकतात़ सेना-भाजपा युती झाल्यास ही जागा भाजपा मागू शकते़ विद्यमान आ़नागेश पाटील व माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यामध्ये तिकीटासाठी संघर्ष होवू शकतो़ काँग्रेसच्या दावेदारांना आपसात लढवून नव्याने पक्षात दाखल झालेले सुभाष वानखेडे हेही आमदारकीचे तिकीट मागू शकतात़ यापूर्वी भारिप पक्षाकडून गंगाधर पाटील चाभरेकर, गणेश राठोड, झाकीर चाऊस, डॉ़ बळीराम भुरके यांनी काँग्रेसचे गणित बिघडवले होते़ त्यामुळेच वंचितची भूमिका या मतदारसंघात महत्वाची राहिल़ आतापर्यंत या मतदारसंघात दुहेरीच लढती झाल्या़ परंतु या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे़ उमेदवारीसाठी प्रमुख पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे़ वंचितकडून लढण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावल्याचे सद्य:स्थितीत चित्र आहे़