वहाबोद्दीन शेख।नायगाव बाजार : विधानसभा, लोकसभेला युती, आघाडी होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी स्वबळाचा नारा घुमतो. याचा परिणाम कार्यकर्त्यांतील सलोख्यावर होतो. त्यामुळेच युती असो वा आघाडी या दोघांनाही स्थानिक कार्यकर्त्यांत मनोमिलन घडविण्याचे आव्हान आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांची एकजूट ठेवण्यासाठी पुढाकार न घेतल्यास याचे परिणाम निवडणूक निकालावर दिसणार आहेत.नायगाव तालुका इतर तालुक्यांच्या तुलनेत नवीन आहे. पूर्वी तो बिलोली तालुक्यात व बिलोली विधानसभा मतदारसंघात होता़ १९९९ मध्ये नायगावला तालुक्याचा दर्जा मिळाला आणि नंतर विधानसभा मतदारसंघ म्हणून त्याला ओळख मिळाली़ काँग्रेसची जुनी मंडळी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दूरदृष्टीने मनातून झटत होती़ त्याचाच फायदा पुढच्या पिढीतील कार्यकर्त्यांनाही मिळत आहे़ बारूळचा मानार प्रकल्प माजी गृहमंत्री कै़शंकरराव चव्हाण यांनी उभारला़ त्यास कै़ बळवंतराव चव्हाण यांनी सहकार्य केले़ या प्रकल्पामुळे नायगाव तालुक्यातील बहुतांश शेती मानारच्या लाभक्षेत्राखाली आली़ त्यामुळे या भागातील मतदार नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिला आहे. विद्यमान खा़ अशोकराव चव्हाण यांनीही गोदावरी नदीवर बळेगावला कोल्हापुरी बंधारा बांधला़ त्यामुळे बऱ्याच गावचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटला़ आ़ वसंतराव चव्हाण यांनीही पाणी, रस्त्यांसह सुगावच्या धरणाचा प्रश्न मार्गी लावला, ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे़नायगावची नगरपंचायत, पं़स़चे ३ गण, जि़प़चा एक गट व अनेक संस्था या काँग्रेसच्या ताब्यात आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदींची लाट असतानाही तालुक्यातून आ़ वसंतराव चव्हाण यांना दहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता काँग्रेस-राष्ट्रवादी लोकसभेसाठी एकत्र आले आहेत. त्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे गंगाधरराव कुंटूरकर, भगवानराव भिलवंडे, राजेश कुंटूरकर, बाळासाहेब धर्माधिकारी, सूर्याजी चाडकर, वसंत सुगावे, परबता पाटील, पांडुरंग गायकवाड यांचेदेखील मनोमिलन होणे गरजेचे आहे़ तसे झाल्यास याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होवू शकतो़नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी कसरततालुक्यात भाजपादेखील कासव- गतीने पुढे सरकत आहे़ जि़प़चे दोन गट, पं़स़चे तीन गण आज भाजपाच्या ताब्यात आहेत़ नगरपंचायतमध्ये देखील भाजपाने एका सदस्याच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळीही भाजपा उमेदवार राजेश पवार दुसऱ्या क्रमांकावर होते. आज पवार आणि माजी खा़ भास्करराव पा़ खतगावकर या दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसतात.राजेश पवार हे तालुक्यातील रहिवासी असले तरी भास्करराव पाटील खतगावकरांना मानणारा एक मोठा गटदेखील तालुक्यात आहे़ जिल्ह्याची धुरा सांभाळणारे आ़ राम पाटील रातोळीकरांना मात्र ‘कभी इधर तो कभी उधर’ करीत पक्षाचे काम करावे लागत आहे़ एकंदरीत पाहता तरूण मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी पक्षांनी कंबर कसली असली तरी यावेळेस लोकसभेचे उमेदवार कोण? यावरच पुढील गणित ठरणार आहे़
गटबाजी मोडीत काढण्याचे आघाडी, युतीसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:34 AM