नांदेड : पंतप्रधान मोदी यांनी मागील साडे चार वर्षात भाई और बहने असे म्हणून लोकांची फसवणूक केली आहे. जनतेच्या पैश्यातून यांनी जाहिराती सुरु केल्या आहेत. यामुळे 'बहोत हो गयी जुमले की मार आवो बदले मोदी सरकार' ही जनतेची भावना आहे, अशी जोरदार टीका खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.
महाआघाडीच्या प्रचाराची सुरुवात नांदेड येथील सभेपासून होत आहे. सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, जोगेंद्र कवाडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील,धनंजय मुंडे यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, नांदेडची ही सभा ऐतिहासिक असून धर्मांध शक्तीच्या विरोधात आहे. मागील निवडणुकीत मतांची विभागणी झाल्याने 30 टक्क्यांवर भाजप सत्तेत आली. त्यामुळे 70 टक्के लोकांनी एकत्र आले पाहिजे या उद्देशाने ही महाआघाडी आकारास आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी मागील साडे चार वर्षात भाई और बहने असे म्हणून लोकांची फसवणूक केली आहे. जनतेच्या पैशातून जाहिराती देण्यांत येत आहेत. यामुळे, 'बहोत हो गयी जुमले की मार आवो बदले मोदी सरकार' ही जनतेची भावना असून विश्वास ठेवा, महाआघाडी चमत्कार करेल, असेही यावेळी खासदार चव्हाण म्हणाले.
स्वाभिमान कुठे गेला भाजप-शिवसेना हे, उखड देंगे, युती गेली चुलीत असे म्हणत होते. मात्र आता स्वाभिमान गेला चुलीत असे चित्र आहे. आम्ही मोर्चे काढले, त्यामुळे कर्जमाफी झाली. परंतु ही कर्जमाफी लोकांपर्यंत पोहचलीच नाही, आज देशात आणि राज्यात दुष्काळाचे थैमान सुरू आहे. दुष्काळ घोषित होऊनही अद्याप काहीच मिळाले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.