हदगाव (नांदेड): मनाठा येथिल मजुरांना रिक्षामधून आंध्रप्रदेशातील बोथच्या कापूस जिनींगवर सोडून परत येणाऱ्या दोघांवर चोर समजून जमावाने खडकी फाट्याजवळ १५ किमी पाठलाग करून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षातील दोघे युवक गंभीर झाले आहेत. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या सर्वत्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. शेतक-याकडे सोयाबीन, कापूस विक्री करुन दिवाळी सणासाठी पैसे जमा केले पण अनेक गावात भुरट्या चोऱ्या, दरोडे सुरू आहेत. मनाठा येथिल प्रतीक संतोष जाधव व त्याचा मित्र निखील गौतम नरवाडे हे दोघे मनाठा येथिल काही मजुरांना आंध्रप्रदेशातील म्हैसा तालुक्यातील बोथ येथिल कापूस जिनींगवर घेऊन गेले होते. दरवर्षी दसरा झाला की येथिल मजुर बोथला जातात. त्या मजुरांना सोडून परत येत असताना हिमायतनगर तालुक्यातील खडकी फाट्याजवळ काही युवकांनी या रिक्षाचालकास सांगितले की, आमच्याकडे चोरांचा सुळसुळाट झाला आहे. वाहने अडवून लुट करीत आहेत. त्यामुळे प्रवासी म्हणून हात दाखविला तरी थांबू नका.
दरम्यान, पुढे जाताच रात्री ९:३० वाजेदरम्यान खडकी फाट्यावर गेल्यास १०-१२ माणसे उभे दिसले. घाबरून चालकाने रिक्षाचा वेग वाढवला. यामुळे जमावाने चोर समजून दुचाकीवर त्यांचा पाठलाग केला. १५ किमी पाठलाग केल्यानंतर रिक्षा अडवून जमावाने दोघांवर लोखंडी राँड, सळई, चाकूने प्राणघातक हल्ला केला. पुन्हा गावातील २५-५० लोक आली व त्यांनीही बेदम मारहाण केली. दोघे बेशुद्ध झाल्यानंतर जमाव परतला. काही वेळाने शुद्धीवर येताच दोघे रात्री उशिरा गावी गंभीर जखमी अवस्थेत गावी परतले. ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. गावचे सरपंच प्रतिनीधी विशाल शिंदे, उत्तमराव शिंदे, पांडुरंग तरटे तंटामुक्त अध्यक्ष संतोष व्यवहारे, संतोष जाधव पालक,गौतम नरवाडे पालक यांनी हिमायतनगर गाठुन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.