नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे माजी आ. वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी सकाळी काँग्रेेस नेते अशोकराव चव्हाण यांनी या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. या निवडीच्या वेळी भाजपाचे चारही संचालक गैरहजर राहिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्रित लढविली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळविला. तर विरोधी भाजपाला अवघ्या चार जागावर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने चार तर एका जागेवर शिवसेनेचा संचालक विजयी झाला. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे अध्यक्षपद जाणार हे स्पष्ट होते. त्यानुसार पालकमंत्री चव्हाण यांनी नायगाव मतदार संघातून सलग तीन वेळा आमदारकी भुषविलेल्या वसंतराव चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिहरराव भोसीकर यांची वर्णी लागली. या दोघांनीही आ. अमरनाथ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नामनिर्देशन पत्र दाखल केले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
जिल्हा बँकेला सर्वतोपरी सहकार्य करणारअध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर दुपारी २ च्या सुमारास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे जिल्हा बँकेत आगमन झाले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करीत चव्हाण यांनी संचालकांशी संवाद साधला. ग्रामीण भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही संस्था जबाबदारीने चालविण्याची गरज आहे. जिल्हा बँकेला राज्य सरकारचे सर्वोतोपरी सहकार्य राहिल, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी यावेळी दिली.