विविध महाविद्यालयात विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वेळेवर मानधन दिले जाते आहे. विभागीय सहसंचालक कार्यालय देयक देण्यासंदर्भात दुर्लक्ष करत असल्याने प्राध्यापकांवर सद्यस्थितीत बेरोजगारीचे संकट निर्माण झाले असून प्राध्यापकांना आता मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित अनुदानित महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे फेब्रुवारी महिन्यात थेट नियुक्त्या देण्यात आल्या. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी महाविद्यालयातील ऑनलाइन तासिका घेतल्या. आणि विद्यापीठाच्या परीक्षेच्या अंतर्गत गुणाचे काम केले. नियुक्त्या देऊन चार महिने उलटले असून अद्यापही एका सत्राचे देयके काढण्यासंदर्भात विभागीय सहसंचालक यांनी महाविद्यालयाला अजूनही पत्र दिलेले नाही. पत्र न मिळाल्यामुळे महाविद्यालय तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे देयक सादर करून घेत नाहीत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अनुदानित संलग्नित १२५ असे एकूण महाविद्यालय संख्या असून या महाविद्यालयात जवळपास अडीच ते तीन हजार प्राध्यापक मानधन तत्त्वावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्याचे मानधन प्राध्यापकांना मिळाले नसल्यामुळे बेरोजगारीचे मोठे संकट त्यांच्यापुढे उभे आहे.
कोरोना आपत्ती काळात सीएसबी प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षाविषयक अंतर्गत गुणदान आणि ऑनलाइन तासिका , महाविद्यालयाची विविध कामे
केली असून मात्र मागील चार महिन्यांपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. विभागीय सहसंचालक यांनी याकडे लक्ष देऊन मानधनाचा प्रश्न दूर करावा अशी मागणी होत आहे.
चौकट- तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी कोरोना आपत्ती काळात जिवाची पर्वा न करता महाविद्यालय आणि विद्यापीठाची परीक्षेची कामे व वेळेवर तासिकाही घेतल्या आहेत. चार महिन्यांपासून प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होतात मात्र आमचे मानधन देण्यास टाळाटाळ केली जाते हा प्रश्न आहे.
डॉ.भारत कचरे,सी.एच.बी. प्राध्यापक