नांदेड : काय अवस्था आहे, त्या राज आणि त्यांच्या मनेसेची. मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उनसे झाली आहे, म्हणजे उमेदवार नसलेली सेना. लग्न दुसऱ्याच आणि हे नाचून राहिले आहेत. म्हणजे, रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेडच्या भोकरमधील सभेत त्यांच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी मंच भाडाने आणला, काल नेता भाड्याने आणला. नवी पॅटर्न तयार केलाय अशोक चव्हाणांनी समर्थन मिळवण्यासाठी, असे म्हणत अशोक चव्हाण यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला असे सांगितले. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही 2 हजार 226 कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसं विसरता? असाही सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी कालच्या नांदेडमधील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. यावेळी राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. पाण्यावरुन वाद सुरू आहेत. मात्र अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील पाणी गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण याविरोधात बोलण्याची महाराष्ट्र सरकारची हिंमत नाही. कारण बसवलेला मुख्यमंत्री काहीही करु शकत नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. राज्यातील पाणी गुजरातला नेले जाते आहे. मराठवाडा, नाशिकचे पाणी गुजरातकडे वळवण्याचे काम सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द काढत नाही, अशी टीका राज यांनी केली.