नांदेड : जनतेच्या दर्शनासाठी ही महाजनादेश यात्रा होती की जनतेला दर्शन देण्यासाठी ? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. या यात्रेतील मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये अहंकाराचा दर्प आणि हुकूमशाही मानसिकता दर्शविणारी होती. यात्रेच्या माध्यमातून केवळ घोषणाबाजी झाली. ही यात्रा म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची केलेली निव्वळ धूळफेक असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनंतर सोमवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन यात्रेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. यात्रा लोकांसाठी असती तर मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला असता. त्यांची निवेदने स्वीकारली असती. मात्र जनतेचे म्हणणे ऐकून न घेता मुख्यमंत्र्यांनी यात्रेच्या माध्यमातून खोटे पण रेटून बोलण्याचा धडाका लावला होता, असे ते म्हणाले. यात्रा येण्यापूर्वीच अनेक कार्यकर्त्यांची धडपकड करण्यात आली. काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनीही याबाबत तारतम्य बाळगले नाही. धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नीला नजरकैदेत ठेवून महिलांप्रति असलेला सरकारचा दृष्टिकोनही दाखवून दिला. असाच लाजीरवाणा प्रकार राज्यभरात घडला. या दडपशाहीचा काँग्रेसच्या वतीने मी निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रमात एकाही महत्त्वाच्या मुद्यावर, सार्वजनिक प्रश्नावर ठोस आश्वासन दिले नाही. नांदेडकरांचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले नाही. आता इसापूरचे पाणी नांदेड शहराला देण्याचे सुतोवाच करुन नांदेड शहर विरुद्ध ग्रामीण असा नवा वाद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कसलीही माहिती न घेता याबाबत मुख्यमंत्री बोलले. इसापूरचे पाणी नांदेडला देणार असाल तर शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही चव्हाण यांनी केला. शासनाच्या या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील ६४ हजार हेक्टर सिंचनक्षेत्र कमी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नांदेड शहर आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडमध्ये काही घोषणा केल्या. मात्र, या घोषणा पाहिल्यानंतर मला कल्याण, डोंबिवली आणि नाशिक महापालिकेची आठवण झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधीचा निधी कल्याण, डोंबिवलीला देण्याची घोषणा याच मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र डोंबिवलीकरांना काहीही मिळाले नाही. तीच बाब नाशिकची. नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री त्यानंतर नाशिककडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर किती विश्वास ठेवायचा? असा सवाल चव्हाण यांनी केला. पक्षांतरावर बोलताना चव्हाण म्हणाले की, खऱ्या अर्थाने नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची उत्तम वेळ आली आहे.
अतिरेकी रिंधापुढे पोलीस हतबलअतिरेकी असलेला रिंधा नांदेडमध्ये डॉक्टर्स, क्लासेसचालकांसह नगरसेवकांकडेही खंडणीची सर्रास मागणी करीत आहे. अशाप्रकारच्या सहा ते सात घटना मागील काही दिवसांत पुढे आल्या आहेत. कोकूलवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या मुलालाही खंडणीसाठी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या गंभीर प्रकारानंतरही पोलीस यंत्रणा सुस्त असल्याचे दिसते. पोलिसांची भीती उरलेली नसल्यानेच रिंधासारख्या प्रवृत्ती वाढत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.