लोहा तालुक्यातील जानापूरी येथील सेवा सहकारी संस्थेवर खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचा ठराव पाठविला होता. मात्र सदर तारखेला ते संस्थेचे सभासद नव्हते. शेतकरी सुद्धा नाहीत. त्यांना बोगस सभासद करुन घेण्यात आल्याचा आक्षेप नितीन गिरी यांनी घेतला होता. परंतु आक्षेपकर्ते जिल्हा बँकेचे सभासद नाहीत. त्यांनी आक्षेप अर्जाद्वारे केलेली विनंती ही बँकेच्या अधिकारी कक्षेतील नाही. सातबारा व अन्य कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधिन राहून निर्णय घेणे उचित होईल. असा अहवाल लोह्याचे सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिंबधकांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.लातूर येथील विभागीय सहनिबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी आक्षेप मंजूर केल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून चिखलीकर वंचित राहणार होते. विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयास चिखलीकर यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले. सोमवारी या प्रकरणात सुनावणी झाली. न्या.व्ही.के.जाधव यांनी विभागीय सहनिबंधक देशमुख यांच्या आक्षेप मंजूर केल्याच्या निर्णयास स्थगिती देवून खा.चिखलीकर यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चिखलीकरांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मतदार यादीत चिखलीकरांचे नाव कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:20 AM