लॉकडाऊनमध्येही वाळू उपसा सुरूच
नांदेड : शहरात लॉकडाऊन लावलेला असताना आसना तसेच गोदावरी नदीतून चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा सुरूच आहे. छोट्या टेम्पो अथवा मिनी ऑटोमधून वाळूची वाहतूक केली जात आहे. गोवर्धन घाटाच्या वरील बाजूस वाळू उपसून काठावर जमा केली जाते. त्यानंतर सदर वाहनातून वाळूची वाहतूक करण्यात येते. रात्रीला पोलिसांकडून सदर वाहनांची साधी विचारणादेखील होत नाही.
जुगाराचे डाव वाढले
नांदेड : शहरातील मूळ तरोडा गाव परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये अनेक ठिकाणी जुगाराचे डाव बसत आहेत. त्या ठिकणी मद्य आणि भोजनाचीही व्यवस्था केली जात असल्याने काही राजकीय नेतेमंडळी तसेच माजी अधिकारीही पत्त्यांच्या डावावर बसलेले पाहायला मिळत आहे. या परिसरातील काही शेत, आखाडे जुगारासाठी परिसरात प्रसिद्ध झाले आहेत.
पाणी पुरवठा सुरळीत हाेईना
नांदेड: शहराचा भाग म्हणून वाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहणा-या हजारो कुटुंबांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. कॅनॉल रस्ता परिसरातील सर्वच नगरामध्ये उच्च दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर मार्चच्या शेवटालाच अनेक घरासमोर टँकर उभे असलेले पाहायला मिळत आहे. या परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्याची गरज आहे.
घरगुती कार्यक्रमांवर भर
नांदेड : होळी सणानिमित्त आयोजित करण्यात येणा-या पूजेच्या कार्यक्रमांना सामूहिक रूप न देता त्यास घरामध्येच आपल्या अंगणातच साजरा करण्यावर नांदेडकरांनी भर दिला आहे. रविवारी होळी पेटविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोरच साध्या पद्धतीने पूजन करून होळी साजरी केली. त्यात काहींनी घराबाहेर न पडणेच पसंत केले.
नागरिकांना आवाहन
नांदेड, शहरातील कोरोना रुग्ण वाढत असताना घराबाहेर पडून रंग खेळाल तर आयुष्याचा बेरंग होईल. त्यामुळे रंगपंचमी सण घरातच राहून साजरा करावा, असे आवाहन कॉ.डॉ. उज्ज्वला पडलवार यांनी केले आहे. रंगावर पैशाची उधळण करण्यापेक्षा लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या बेघर तसेच मनोरुग्णांना अन्नदान, कपडेदान करून सण साजरा करावा, असे आवाहन केले.