शहरातील रस्ते नेदरलँडच्या धरतीवर करण्यात आले. या रस्त्यांची रचना वाहतुकीसाठी अडचणीची ठरली. त्यात शहरातील वाहनांची वाढती संख्या, वाहनचालकांचा मनमानीपणा यामुळे वाहतुकीला शिस्त लागलीच नाही. विशेषत: शहरातील ऑटोचालकांना शिस्त लावण्यास वाहतूक शाखा व पोलीस विभाग अपयशीच ठरला आहे. ऑटोचालक प्रवासी दिसेल तेथे ऑटो थांबवतात. मुख्य रस्त्यावरही प्रवाशांना घेतले जाते. त्यामुळे इतर वाहनधारकांची व प्रवाशांची फरफट होते.
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
बसस्थानक
बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांना शहरात इतरत्र सोडण्यासाठी बसस्थानक परिसरात ऑटोचालकांची गर्दी असते. कधी कधी तर ऑटो रस्त्यात उभे असल्याने प्रवाशांना बसस्थानकात जाणेही अवघड होते.
बर्की चौक
जुन्या नांदेडातील बर्की चौक हा भाग नेहमी गजबजलेला असतो. येथे कुठेही उभे केलेले ऑटो बेशिस्त वाहतुकीसाठी कारणीभूत ठरतात. या ठिकाणी गर्दीतून अनेकांचे खिसेही कापले जातात. तर येथे वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच आहे.
शिवाजीनगर
शहरातील शिवाजीनगर भागातही ऑटोचालक नेहमीच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. याचा फटका अनेकदा व्हीआयपींनाही बसला आहे. वारंवार सूचना देऊनही ऑटोचालकांना वळण लागले नाही. शहरातील इतर भागातही अशीच परिस्थिती आहे.
प्रवाशांना त्रास
ऑटोचालकांच्या मनमानीचा मोठा फटका शहरातील वाहनधारकांना बसत आहे. मुख्य रस्त्यातच अचानक ऑटो थांबवला जातो. त्यामुळे पाठीमागून येणारी वाहतूक खोळंबते.
- विजय ऋषीपाठक, अष्टविनायकनगर
प्रवासी मिळविण्यासाठी अनेक वेळा चढाओढ होते. रस्त्यात एखाद्या प्रवाशाने हात दाखविला की, त्याच ठिकाणी ऑटोरिक्षा थांबविला जातो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.
-जगदीश खाडे, पिवळीगिरणी
रिक्षाभाड्यात वाढ
पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, ऑटोचालकांनी भाड्यामध्ये वाढ केली आहे. जवळपास १० ते १५ रुपयांची भाडेवाढ करण्यात आल्याने प्रवाशांत नाराजी आहे.
शहरातून सिडको-हडकोत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. जुनामोंढा ते सिडको-हडको २० रुपये भाडे आकारले जाते, तसेच जुनामोंढा ते तरोडा नाका ३० रुपये भाडे घेतले जाते.
रात्रीच्या वेळी तर प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जाते. शहरात ऑटोला मीटर नाही. त्यामुळे अडचणीत असलेल्या प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागते.
वाहतुकीला अडथळा
शहरात वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. त्यात कलामंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरही ऑटोचालकांच्या मनमानीचा इतर वाहनांना फटका बसत आहे.