नांदेड : दरवर्षी पावसाळ्यात शहरातील ११३ नाले ओव्हरफ्लो होत पाणी रस्त्यावरुन वाहते़ शहरातील हे नाले पावसाळ्यात नांदेडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत़ त्यात यंदा मान्सूनपूर्व नालेसफाईला पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येणार आहे़ या कामाचा प्रस्ताव प्रभारी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे़ त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे़शहरात लहान- मोठे ११३ नाले आहेत़ दरवर्षी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करुन या नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करण्यात येते़ परंतु मान्सूनपूर्व कामाचा दर्जा पहिल्याच मोठ्या पावसात उघडा पडतो़ हा आजवरचा नांदेडकरांचा अनुभव आहे़ नाले ओव्हरफ्लो होवून घाण पाणी रस्त्यावर वाहते़ त्यामुळे मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून नांदेडकरांना वाट काढावी लागते़ मोठे नाले असलेले जयभीमनगर, चंद्रलोक हॉटेलसमोरील नाला, बाबानगर, चुनाल नाला, कालापुल नाला, देगलूरनाका नाला, दत्तनगर नाला या नाल्यांचे पाणी शेजारील नागरी वस्त्यांमध्ये शिरते़ विशेषत: जयभीमनगर, श्रावस्तीनगर, वसंतनगर, दत्तनगर भागामध्ये या नाल्यांचा अधिक फटका बसतो. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान होते़ गतवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामावर तब्बल ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते़ परंतु तरीही नाल्या तुंबल्या होत्या़ पावसाळा सुरु झाला तरी, अनेक भागातील कामे पूर्ण करण्यात आली नव्हती़ तर काही भागात नाल्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे़ या अतिक्रमणाकडेही महापालिकेने दुर्लक्ष केले आहे़ त्यासाठी संबधित प्रभागातील नगरसेवकही तेवढेच कारणीभूत आहेत़ जयभीमनगरचा नाला तुंबल्यामुळे नगरसेवकासह नागरिकांच्या घराला पाण्याने वेढले होते़ यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला होता़ परंतु दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवत आहे़नालेसफाईच्या कामासाठी प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात ११३ लहान-मोठ्या नाल्या सफाईच्या कामाला सुरुवात होणार आहे.सहा पोकलॅडने कामेकाही नाल्यांची जेसीबी व पोकलँडच्या सहाय्याने सफाई करण्यात येईल तर काही नाले अडचणीच्या ठिकाणी मनुष्यबळाच्या सहाय्याने सफाई करण्यात येतील. पोकलँड प्रतितास १ हजार २५० रुपये तर जेसीबी ११०० रुपये दराप्रमाणे जवळपास सहा यंत्रसहाय्य उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
मान्सूनपूर्व नालेसफाईला पुढील आठवड्याचा मिळणार मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:09 AM
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील ११३ नाले ओव्हरफ्लो होत पाणी रस्त्यावरुन वाहते़ शहरातील हे नाले पावसाळ्यात नांदेडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत़ त्यात यंदा मान्सूनपूर्व नालेसफाईला पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येणार आहे़
ठळक मुद्दे११३ नाले : गतवर्षी झाला होता ५४ लाखांचा खर्च