नांदेड : महापालिका हद्दीत स्वच्छतेचे कंत्राट हे मे.आर.ॲन्ड बी इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे; परंतु गेल्या चार वर्षांपासून कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक करण्यात येत आहे. दर महिन्याला १० तारखेला वेतन देण्याऐवजी चक्क महिना अखेरीस ते देण्यात येत आहे. जुलै महिन्याचे वेतनही अद्याप हाती पडले नाही. त्यामुळे शनिवारपासून या कामगारांनी संप पुकारला आहे. ऐन सणासुदीत शहर स्वच्छतेचे तीन-तेरा वाजणार आहेत.
मे.आर.ॲन्ड बी इन्फ्रा या कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट दिल्यापासून गेल्या चार वर्षांत कामगार आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही साहित्य पुरविण्यात आले नाही. वेतनालाही विलंब लावण्यात येतो. त्यामुळे शनिवारपासून हे कामगार संपावर जाणार आहेत. याबाबत नांदेड वाघाळा महापालिका कामगार, कर्मचारी युनियनने आयुक्तांना निवेदन दिले आहे.
काय आहेत कामगारांच्या मागण्याकंत्राटी कामगारांना घरभाडे द्यावे, मासिक वेतन दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत करावे, घनकचरा वाहतूक करणाऱ्या कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे द्यावे, ईपीएफची रक्कम अद्याप खात्यात जमा करण्यात आली नाही. कंत्राटींना मनपाच्या सेवेत घ्यावे आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.