नांदेड- कृषी मंत्री अब्दूल सत्तार हे रविवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय बैठक पार पाडल्यानंतर ते माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. चर्चेनंतर त्यांनी एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले.
मंत्री अब्दूल सत्तार हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर थेट माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी सत्तार म्हणाले, माझ्या राजकीय जीवनात अशोकराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत पोहचलो आहे. त्यांचा मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा अभ्यास चांगला आहे.
तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांचीही जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे आर्शिवाद तसेच दिलेल्या सुचनांची पुढील काळात शेतकर्यांसाठी अंमलबजावणी करु. तर अशोकराव चव्हाण यांनी राजकारणात मतभेद असावेत परंतु वैयक्तीक वाद असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, या दोघांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे मात्र पुढे आले नाही.