देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:22 PM2024-10-07T16:22:55+5:302024-10-07T16:35:07+5:30

केवळ उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्यांना महाविकास आघाडीमधील इच्छुकांनी विरोध दर्शवला आहे

Closeness of former Degalur MLA BJP's Subhash Sabane to Mahavikas Aghadi; Opposing aspirants to defectors for candidacy | देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक

देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक

- शेख शब्बीर
देगलूर:
 माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपाचा त्याग करून लवकरच महाविकास आघाडीत पक्ष प्रवेश करून उमेदवारी मिळविणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशास महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांकडून विरोध केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून कोणीही यावे व उमेदवारी मिळवावी, हे धोरण आम्हाला मान्य नसल्याचे सांगत प्रसंगी बंडाचा झेंडा हाती घेऊ, असा निर्वाणीचा इशारा राज्यस्तरावरील महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांकडून दिला जात आहे.

आमदार जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतल्याने रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी जवळपास ३५ इच्छुक उमेदवार रांगेत उभे राहिले आहेत. खासदार अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक व त्यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले माजी आमदार जितेश अंतापुरकर यांनी नुकतेच काँग्रेसचा हात सोडून भाजपाचा कमळ हाती घेतल्याने भाजपात आपली डाळ शिजणार नाही याची जाणीव होताच मागील तीन वर्षापासून भाजपाकडून निवडणुक लढविण्याची तयारी करत असलेले साबणे भाजपच्या कार्यक्रमापासून अंतर ठेवून असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभा लढविण्याचा निर्धार केलेले साबणे हे अन्य पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट, या महाविकास आघाडीतील राज्य स्तरावरील  नेत्यांच्या संपर्कात राहून प्रसंगी पक्षप्रवेश करीत उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला मतदार संघात उधान आले आहे.

त्यातच राखीव असलेल्या या मतदार संघाची कदाचित ही शेवटची निवडणूक राहण्याची शक्यता असल्याने 'अभी नही तो कभी नही, असा नारा देत यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी मागील सहा महिन्यापासूनच निवडणुकीची तयारी चालविली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून कुणीही यावे व उमेदवारी मिळवावी हे धोरण आम्हाला मान्य नसल्याचे सांगत प्रसंगी आम्ही बंडाचा झेंडा हाती घेऊ असा निर्वाणीचा इशारा महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांकडून दिला जात आहे. पुढे हा विरोध आणखीन तीव्र होण्याची लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे  साबणे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशास  केला जात असलेला विरोध पाहता महाविकास आघाडीतील नेत्यांसह सुभाष साबणे यांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. अगोदरच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतापुरकरांच्या भाजपा प्रवेशामुळे उमेदवारीवरून कोंडीत सापडलेले साबणे पुन्हा एकदा या विरोधामुळे पुरते अडचणीत सापडले आहेत.  

बौद्ध उमेदवार देण्याची वाढतेय मागणी
२००९ साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या या मतदार संघात एकूण चार वेळा निवडणुका घेण्यात आल्या मात्र या चारही निवडणुकीत प्रमुख पक्षांकडून बौद्ध समाजाला उमेदवारी देऊन नेतृत्व करण्याची संधी देण्यात आलेली नाही. जवळपास ५५ हजार मतदार संख्या असलेल्या बौद्ध समाजास किमान यंदाच्या निवडणुकीत तरी महायुती किंवा महाविकास आघाडी कडून  नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरीत आहे. त्यातच कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुक लढविण्याचे चंग बांधलेले सुभाष साबणे यांच्यापुढे एकीकडे अंतापुरकरांचा भाजपा प्रवेश तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांचा विरोध पाहता साबणे यांच्यापुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीला ते कसे सामोरे जातात हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होणार आहे.

चारही निवडणुका साबणे विरुद्ध अंतापुरकर 
विशेष म्हणजे, २००९ साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या मतदारसंघात एकूण चार वेळा निवडणूका झाल्या. मात्र या चारही निवडणुकीत अंतापुरकर विरुद्ध साबणे अशीच लढत झाली आहे. यात २००९ साली कॉँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर, २०१४ शिवसेनेचे सुभाष साबणे तर २०१९ साली पुन्हा कॉँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले. मात्र, २०२१ मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश आणि भाजपामध्ये केलेल्या सुभाष साबणे यांच्यात लढत झाली. यात जितेश अंतापूरकर हे विजेयी झाले. आता जितेश यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला आहे. 

Web Title: Closeness of former Degalur MLA BJP's Subhash Sabane to Mahavikas Aghadi; Opposing aspirants to defectors for candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.