नांदेड : 'अच्छे दिन' ही काही लोकांना शिवी वाटते. ती वाटणारच कारण त्यांचे 'बुरे दिन' सुरू झालेत. या सरकारने योजनातील दलालीही बंद केली आहे. त्यामुळे आता रस्त्यावरचा कुत्राही तुम्हाला विचारत नाही. हे तुमच्याच पापाचे भोग आहेत. काळजी करू नका अन् पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी किंवा गरिबांसाठी तुरुंगात गेला नव्हता. भ्रष्टाचार करून राज्याच्या तिजोरीतील पैसा स्वत:च्या तिजोरीत भरल्यानं तुमची रवानगी तुरुंगात झाली होती. तीन वर्ष तुम्ही तुरुंगात होता आणि अजूनही तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, हे विसरू नका. त्यामुळे किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, अशा कडक शब्दांत त्यांनी छगन भुजबळ यांनी 'शाळा' घेतली.
नांदेडातील भक्ती लॉन्स येथे आयोजित भाजपाच्या बुथ कमिटी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले, पुलवामा येथील हल्ल्याच्या ४८ तासांच्या आत यातील आंतकवाद्यांना कंठस्रान घालण्यात आले. सेनेला मोकळीक दिल्यानंतर काय होते हे सर्जिकल स्ट्राईकमधून जगाने पाहिले. आता पुन्हा एकदा सेनेला मोदींनी मोकळीक दिली असून हा नवा भारत आहे, असा संदेश जगात गेला आहे. जगात अशाप्रकारे कुठे हल्ला झाल्यास सर्व पक्ष एकजूट दाखवित सैन्याच्या पाठीमागे उभे राहतात. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात विरोधी पक्ष एकीकडे सांगत आहेत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अन् दुसरीकडे दररोज पत्रकार परिषदा घेऊन नवेनवे आरोप करीत सुटले आहेत. हल्ल्याच्या या घटनेचेही राजकारण केले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.