नांदेड: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत देशातील पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडाही सांगितले. ते म्हणाले, विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात लोकांची दिशाभूल केली जाते. देशात पाण्याचा मुभलक साठा आहे. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. आपल्या देशात 1.40 लाख टीएमसी पाऊस पडतो. त्यातील अर्ध्याचे बाष्पीकरण होते. उरलेले पाण्यातील मोठा साठा वाया जातो. कोणत्याच सरकारने कधीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही.
सरकार दमदार असेल, योजना बदलल्या तर प्रत्येकाला पाणी मिळू शकते. देशात चांगले पाणी मिळत नाही, केंद्र सरकार फक्त तमाशा बघतंय. सतलज-रावीसाठी पंजाब लढतोय, गोदावरीसाठी महाराष्ट्र-कर्नाटक लढतोय, महानदीसाठी ओरिसा लढतोय. पाण्याचा मुभलक साठा आहे, देवाने आपल्याला पाणी दिलंय. पण, देशातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. योग्य नियोजन केल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल.
पाण्याची संपत्ती देशात आहे, तरीदेखील देशातील लोकांना यासाठी त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा पाण्याबाबत मोठा अजेंडा आहे. सरकार खोटं बोलून दिशाभूल करत आहे. त्यामुळे देशाला एक दिशा देणारे सरकार आले पाहिजे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पाण्यासाठी कोणाकडे भीक मागायची गरज नाही, आपण योग्य नियोजन केले पाहिजे. त्यामुळेच मी म्हणतोय, देशात विचारधारा बदलली पाहिजे.