जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातच शेजारील परभणी प्रशासनाने मात्र नांदेडच्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. परंतु नांदेडात मात्र कोणत्याही भागातून सहज येता येते. बसस्थानकावर साधी तपासणी किंवा चौकशीही केली जात नाही. रेल्वेस्टेशनवर नावालाच ॲन्टिजेन तपासणीचे केंद्र उघडण्यात आले आहे. या ठिकाणी क्वचितच प्रवाशांची तपासणी किंवा विचारपूस होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या सीमेवर तपासणी सुरू केली होती. परंतु नंतर ती बंद करण्यात आली.
लग्नसराईनिमित्त बसस्थानकात गर्दी
n सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, त्यासाठी बसस्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी होत आहे. या ठिकाणी ॲन्टिजेन तपासणीचे केंद्र आहे. परंतु कुणीही प्रवासी त्याकडे फिरकत नाही.
n बाकड्यावर दाटीवाटीने प्रवासी बसची वाट पाहात थांबलेले असतात. बसमध्ये जागा मिळविण्यासाठीही झुंबड उडते. विशेष म्हणजे यातील अनेकांनी मास्कही घातलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका राेखणार कसा?
रेल्वेस्टेशनवर तपासणी नावालाच
n नांदेड शहरात पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून दररोज रेल्वे येतात आणि जातात. परंतु रेल्वेस्टेशनवर या प्रवाशांची कुणी तपासणी करीत नाही.
n तिकीट खिडकीसमोरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात येत आहे. रेल्वे गाड्यांमध्येही अनेकजण विनामास्कच दिसून येतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करीत असलेल्या प्रवाशांवर कारवाईची गरज आहे.
जिल्हासीमा सर्वांसाठी मोकळ्याच
n नांदेडला शेजारील विदर्भ, तेलंगणाच्या सीमा आहेत. त्यामुळे दररोज या भागातून शेकडो वाहने आणि प्रवासी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करतात. शेजारील यवतमाळ जिल्हा तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.
n अशावेळी सीमावर प्रवाशांची तपासणी करण्याची गरज आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रवाशांची तपासणी होत नाही. सर्वांसाठी रान मोकळेच आहे.
जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने २१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी शिकविण्या बंद करण्यात आल्या आहेत. दुकानांच्या वेळा सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लग्नसराई, अंत्यविधी या ठिकाणी उपस्थिती निश्चित केली असून, इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही कोरोनावर आवर घालण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना तपासणीचा वेग वाढवून आता दररोज साधारणता अडीच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. शासकीय कार्यालयात प्रवेश करण्याअगोदर कोरोना तपासणी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आली आहे. यासह इतर उपाययोजना केल्या आहेत.