नांदेड - कोरोना काळात बंद झालेली विमानसेवा पुन्हा पुर्ववत होत असून नांदेडातून १९ डिसेंबरपासून नांदेड - अमृतसर - दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. ही सेवा पुरविणार्या एअर इंडियाकडून प्रवाशी बुकींग सुरू झाली असल्याची माहिती एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक गजेंद्र गुठे यांनी दिली.
कोरोनाच्या पूर्वी नांदेडातून एअर इंडियाकडून नांदेड ते दिल्ली आणि नांदेड ते चंदिगढ अशी विमान सेवा पुरविली जात होती. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने देश लाॅकडाऊन करण्यात आला. दरम्यान, बस, रेल्वे सेवेसह सर्वच विमानसेवाही बंद करण्यात आल्या होत्या. त्यात अनलॉक प्रक्रियेदरम्यान नांदेडातून एअर इंडियाकडून अमृतसर सेवा सुरू केली होती. सदर विमान दिल्लीपर्यंत सोडण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. या मागणीची दखल घेत एअर इंडियाकडून १९ डिसेंबरपासून नांदेड - दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी नांदेड ते अमृतसर विमानसेवा १० नोव्हेंबरपासून सुरू केली हाेती. आता दिल्ली विमानसेवा सुरू झाल्याने दिल्ली जाणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
तीन दिवस असणार सेवा
सदर विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असणार आहे. दिल्ली ते नांदेड हे विमान दिल्ली येथून पहाटे ५.५५ उड्डान घेवून अमृतसरला सकाळी ७.१० वाजता पोहचेल. त्यानंतर सदर विमान अमृतसर येथून ८.१० वाजता उड्डाण घेवून हे विमान नांदेड येथे १०.४५ वाजता पोहचेल. तर नांदेड विमानतळावरून परतीच्या प्रवासासाठी हे विमान ११.४५ वाजता उड्डाण घेवून दुपारी २.२० वाजता अमृतसर येथे पोहचेल. त्यानंतर ३.२० वाजता अमृतसर येथून उड्डाण घेवून सायंकाळी ४.३५ वाजता दिल्ली विमानतळावर पोहचेल. सदर विमान १६२ आसनक्षमतेचे असणार आहे.