नांदेड - काेराेना संकटामुळे गेल्या दाेन वर्षांपासून बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे लवकरच सुरू केल्या जातील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी नांदेडमध्ये साेमवारी दिली. मुदखेड ते परभणी, परळी-परभणी, अकाेला-धाेंड या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम लवकरच सुरू हाेणार असून, या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाव्यवस्थापक मल्ल्या यांनी १ नाेव्हेंबर राेजी परळी ते मुदखेड या विभागाचे वार्षिक निरीक्षण केले. त्यांनी परळीसह गंगाखेड, परभणी, पूर्णा, नांदेड आणि मुदखेड स्थानकावर भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी रेल्वे पूल, रेल्वे गेट तसेच रेल्वे कार्यालयाचे निरीक्षण केले. या दाैऱ्यात त्यांनी नांदेडमध्ये दुपारी ४ च्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधला. दाैऱ्याबाबतची माहिती देताना हा वार्षिक निरीक्षण दाैरा पूर्व नियाेजित असताे. यामध्ये रुग्णालय कर्मचारी, सुरक्षा विभाग, सर्व विभागाचे अध्यक्ष तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. जवळपास २०० ते २५० किमीचा हा निरीक्षण दाैरा वर्षभरापूर्वीच नियाेजित केलेला असताे. तयारीला वेळही दिला जाताे.
काेराेना संकटात रेल्वे कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. मालवाहतुकीसह औषधी वाहतुकीतही रेल्वेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. औषधीसह ऑक्सिजनच्या पुरवठा साखळीत कुठेही खंड पडू दिला नाही. यामध्ये अनेक रेल्वे कर्मचारी काेराेनाबळी ठरले. काेराेनाकाळात रेल्वेला संपूर्ण देशभरात ३० ते ४० हजार काेटींचा फटका बसला. सलग दाेन वर्ष हे नुकसान सहन करावे लागले. आता हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. लसीकरणाचाही वेग वाढविला जात आहे. हळूहळू आता विशेष रेल्वेगाड्या नियमित केल्या जात आहेत. लवकरच पॅसेंजर गाड्याही जनतेच्या सेवेत रूजू हाेतील, असेही ते म्हणाले.
नांदेड-वर्धा, नांदेड-बिदर या नव्या रेल्वे मार्गाबाबत प्रगती विचारली असता काेराेना संकटात अनेक कामे खाेळंबली आहेत. त्यामुळे नवे प्रस्ताव सध्यातरी विचारात नसल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी धाेरणात्मक निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातील. असेही ते म्हणाले. यावेळी नांदेड येथे रेल्वेचालकांसाठी नवे विश्रांतिगृह उभारण्यात आले. नव्या लाेकाे रेल्वेसह इतर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाडीवरील चालक व इतर कर्मचाऱ्यांसाठी हे विश्रांतिगृह उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपिंदरसिंघ, मुख्य परिचलन अधिकारी धनंजयलू, मुख्य वाणिज्य अधिकारी जाॅन प्रसाद यांचीही उपस्थिती हाेती.