जिल्ह्यात ३७९ आरोग्य उपकेंद्रे असून यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. तसेच ३३० उपकेंद्रांवरही लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी, नागरिकांनी यामध्ये ज्यांचे वय ४५ वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे. त्यांनी स्वत: व त्यांच्याकडे काम करणाऱ्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोना लस घेऊन संरक्षित व्हावे. लसीकरणाचे प्रमाणपत्र स्वत:जवळ राहील, याची दक्षताही घ्यावी. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानातून सामान्य नागरिकांना कोरोनाचा आजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
चौकट--------------------
जिल्ह्यात २ लाख ३ हजार २४६ जणांना कोरोनाचे दोन डोस
जिल्ह्यात ३१ मार्च अखेर २ लाख ३ हजार २४६ जणांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये ९८ हजार ३९० जणांना विविध शासकीय लसीकरण केंद्रांवर तर जिल्ह्यातील ९ खाजगी रुग्णालयांत १ लाख ४ हजार ८५६ नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस दिले आहेत. पहिला डोस झालेल्या नागरिकांची संख्या ९४ हजार २६५ इतकी आहे.