अवैध धंदे बंद करण्याची मागणी
नांदेड : गाडीपुरा भागातील विहिरीजवळ तसेच इतवारा भागात अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे वाॅर्डातील तरुण मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. इतवारा पोलीस ठाण्याने या भागातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे स. दिलीपसिंघ सोडी यांनी निवेदनाद्वारे केले आहे. गाडीपुरा जुना माेंढा, हबीब टाकी परिसरात अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे बंद करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
वडगावात मतदानावर टाकणार बहिष्कार
नांदेड : जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नाही, तोपर्यंत सर्व निवडणुकीवर नांदेड तालुक्यातील वडगाव येथील सकल मराठा समाज बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिले. ग्रामपंचायत तसेच इतर कोणत्याही निवडणुकीवर मराठा समाजाच्या वतीने एक मताने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
किन्हाळकरांची निवड
नांदेड : येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. गोविंद किन्हाळकर यांची उपप्राचार्यपदी, तर रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस.बी. चव्हाण यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन. शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
गाडगेबाबा यांना अभिवादन
नांदेड : महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत गाडगेबाबा महाराज चौक चैतन्यनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. बालाजी कल्याणकर, सतीश देशमुख, बळवंतराव तेलंग, माधव नायके आदींची उपस्थिती होती.
अखंड हरिनाम सप्ताह
नांदेड : सीबदरा ग्रामस्थांनी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून सतत आठ दिवस कीर्तन सेवा होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ तसेच हरिनाम सप्ताहाचे संयोजक यांनी केले आहे.
अतिक्रमणाचा विळखा
नांदेड : नवीन नांदेडातील धनेगाव येथील शिवरस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवरस्ता खुला करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रभाकर पवळे यांनी केली आहे. धनेगाव ते बळीरामपूर या शिवरस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे प्लॉटिंगमधून रस्ता सुरू झाला आहे.
फिट इंडिया सप्ताह
नांदेड : खुरगाव येथील किड्स किंगडम पब्लिक स्कूलमध्ये फिट इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन व व्हिडिओच्या माध्यमातून क्रीडा शिक्षक, नृत्य प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन करण्यात आले. दरम्म्यान, योगा शिक्षक योगेश कोरडे, तर बुद्धिबळ प्रशिक्षक घाेरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिवसा मिळणार वीज
नांदेड : शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी रात्रीच वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे रात्र जागून काढावी लागत आहे. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. या योजनेचा असंख्य शेतकरी लाभ घेत असून त्यांच्या दिवसा विजेचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
कृषी पंपासाठी २,२३२ शेतकऱ्यांचे कोटेशन
नांदेड : साैर कृषी पंपाद्वारे १६७२ शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण होणार असून, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेेंतर्गत नांदेड जिल्ह्यातून ६ हजार ९४९ अर्ज प्राप्त झाले असून २ हजार २३२ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे.