मागील वर्षापासून विविध खासगी फायनान्स हे महिलांना कर्ज वाटप करीत आहेत. बचत गटांमार्फत तालुक्यातील प्रत्येक गावांत गरजू महिलांना १५ ते २५ हजारांपर्यंत कर्ज दिले गेले आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी महिलांचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता. ठरवून दिलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात हाेते. मात्र कोरोनामुळे महिलांच्या हाताला व कुटुंबातील पुरुषांना काम मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे घरचा खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यामुळे हप्ते कसे भरायचे, याची चिंता लागली आहे. काही फायनान्स कंपन्यांकडून हप्ते मागविले जात नसले तरी व्याजाची रक्कम वाढत आहे. काही प्रतिनिधी हे हप्ते घेण्यासाठी घरी येत आहेत. महिलांकडे पैसे नसल्यामुळे वाद होत आहे. बिकट परिस्थिती बनलेल्या अनेक महिलांना पैशाअभावी संसाराचा गाडा हाकताना कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता वाटत आहे.
चौकट- जिल्ह्यातील ७ हजार २१० बचत गटांपैकी केवळ १२० बचत गटांनाच बँकांनी १ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मागील वर्षी ६ हजार ९२० गटांपैकी २ हजार ८८८ गटांना ५१ कोटी ४५ लाख ७७ हजार रुपयांचे कर्जाचे वाटप केले होते. जिल्ह्यातील २ हजार ६१६ गटांनी कर्जासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र अनेकांची खातेच उघडण्यात आले नाही. बचत गटांना कर्ज पुरवठा होत नसल्याने या बचत गटातील महिलांना खासगी फायनान्सकडून कर्ज घ्यावे लागत आहे.