नियमित रेल्वेच्या वेळेवर आणि मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, विशेष रेल्वे असल्याने कोणत्याही प्रकारच्या सवलती दिल्या जात नाहीत. याचा सर्वाधिक फटका कर्करुग्णांना बसत आहे. कर्करोग व इतर आजारांवर उपचार करण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांचे उत्पन्न अतिशय कमी असते. कर्करुग्णांना विशिष्ट कालावधीत केमोथेरपी देणे आवश्यक असते. त्यामुळे प्रवास टाळता येत नाही. रेल्वेत सवलत मिळत नसल्याने या रुग्णांचे हाल होत आहेत.
कोविड-१९ विशेष रेल्वेचे प्रवासभाडे नियमित रेल्वेपेक्षा अधिक आहे. प्रत्येक प्रवाशाला विशेष रेल्वेचे अतिरिक्त प्रवासभाडे देणे परवडत नाही. रेल्वे बोर्डाला पत्र लिहून नियमित गाड्या सुरू करण्याची विनंती करावी, तसेच ज्येष्ठ नागरिक, कर्करुग्ण, अपंग आणि इतर सवलतधारकांना रेल्वे प्रवासात सवलत सुरू करण्यात यावी, अशी मागणी आता प्रवाशांमधून होताना दिसत आहे.
कोरोना नियमावलीला खो
याशिवाय धावणाऱ्या रेल्वे स्वच्छ नसतात. योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण केले जात नाही. प्रवासी आणि हमालदेखील शारीरिक अंतराचे नियम पाळत नाहीत. टीटीई, कंडक्टर आणि इतर अधिकारी मुखपट्टी वापरत नाहीत. तिकीट तपासणीदेखील केली जात नाही. यात सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.