कंधार ( नांदेड) : मोफत प्रवासाचे कार्ड असून तिकिटाचे पैसे का मागतोस? असा जाब विचारत कंधारमध्ये बस वाहकास शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात नवीन फौजदारी कायद्यानुसार विविध कलमान्वये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ जून रोजी कंधार आगारातून बस ( क्रमांक एम एच २० बी एल १७३८) चालक व्यंकट डांगे यांनी सकाळी साडेसात वाजता घोडज, संगमवाडी, उंमरज मार्गे जाऊन परत निघाले. सकाळी ९.५० वाजता पाताळगंगा पाटी येथून बसमध्ये बसलेल्या प्रवासी सूर्यकांत माणिका किरतवाड ( रा. पातळगंगा) यास तिकीट घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याचे आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास असल्याचे सांगितले. वाहकास शंका आल्याने त्याने ते आधार कार्ड तपासले असता ते मोफत प्रवासाच्या नियमात बसत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाहकाने पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले. तेव्हा त्या प्रवाशाने बस काय तुझ्या बापाची आहे का? सवलत देणारे वेडे आहेत का? असे बोलून वाहक संतोष अरुण कंधारे यांना शिवीगाळ करत बसमध्येच बेदम मारहाण केली.
दरम्यान, चालक व्यंकट डांगे व प्रवाश्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. याप्रकरणी वाहक संतोष अरुण कंधारे यांच्या तक्रारीवरून नव्या कायद्यानुसार कंधार पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. देशात सोमवारपासून ३ नवीन फौजदारी कायदे लागू झाले. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१(१), ३५२ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे नवीन फौजदारी कायद्यानुसार कंधार पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ बी एम व्यवहारे हे करीत आहेत.