वसंतराव नाईक यांना अभिवादन
नांदेड - दीपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका एस. एन. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रल्हाद आयनेले, श्रीधर पवार, बालकृष्ण राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी अविनाश इंगोले, सुदर्शन कल्याणकर, बुधांगना गोखले आदींची उपस्थिती होती.
हरित नांदेड अभियानांतर्गत वृक्षारोपण
नांदेड - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे नांदेड शहर परिसरात हरित नांदेड अभियानांतर्गत गत तीन वर्षांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. आज सीए डेच्या निमित्ताने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडिया नांदेड ब्रँचच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. मनपाचे उपायुक्त शुभम क्यातमवार, मर्चंट व इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद शहा यांच्या हस्ते पर्यावरणपूरक कदंब, बकुळ व वृक्षमित्रांनी पक्ष्यांसाठी ज्यूस बार या संकल्पनेतून तयार केलेली १००० मलबेरी वृक्षांपैकी दहा वृक्ष अशा प्रकारच्या विविध वृक्षांची ट्री-गार्डसह लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन आयसीएआय भवन, स्नेहनगर येथे करण्यात आले होते. यावेळी चार्टर्ड अकाऊंटस् नांदेड ब्रँचचे अध्यक्ष सीए विजय वट्टमवार, सेक्रेटरी सीए मयूर अग्रवाल, कोषाध्यक्ष सीए आनंद काबरा, सीए जयप्रकाश फलोर, सीए कुणाल मालपानी, सीए नवज्योत सिंघग्रंथी, अन्वर अली तसेच मनपाचे उद्यान अधीक्षक डॉ. फरहत बेग, मनपाचे उल्हास महाबळे तसेच वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, अरुणपाल ठाकूर, प्रल्हाद घोरबांड, चैतन्य पिंपळडोहकर, सीए विद्यार्थी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
कृपाछत्र उपक्रमांतर्गत छत्र्यांचे वाटप
नांदेड - भाजपा महानगर नांदेड व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने कृपाछत्र या उपक्रमांतर्गत गुरुवारी मलनिस्सारण विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व उपअभियंता अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते छत्र्या वितरित करण्यात आल्या. यावेळी लॉयन्स क्लबचे सचिव अरुणकुमार काबरा, भाजपा व्यापारी मोर्चाचे उपाध्यक्ष रूपेश व्यास, सुरेश शर्मा, संतोष भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. आतापर्यंत ७६६ छत्र्या वितरित करण्यात आल्या आहेत.