कॉंग्रेसकडून अशोक चव्हाणांकडे पुन्हा मोठी जबाबदारी; राजकीय चिंतन समितीत केला समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:03 PM2022-04-26T14:03:11+5:302022-04-26T14:05:54+5:30
यापूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख पद होते.
नांदेड - काॅंग्रेस पक्षाच्या उदयपूर येथे हाेणाऱ्या चिंतन शिबिरातील राजकीय प्रस्तावाबाबतच्या समितीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशाेक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. १३ ते १५ मे दरम्यान हे चिंतन शिबिर हाेणार आहे. यापूर्वी मंत्री चव्हाण यांच्याकडे चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख पद दिले होते. त्यानंतर ही दुसरी मोठी जबाबदारी मंत्री चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
काॅंग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगाेपाल यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. या समितीत राज्यसभेचे विराेधी पक्षनेते मल्लीकार्जुन खरगे निमंत्रक, तर गुलाम नबी आझाद, अशाेकराव चव्हाण, एन. उत्तमकुमार रेड्डी, डाॅ. शशी थरूर, गाैरव गाेगाेई, सप्तगिरी शंकर उलाका, पवन खेरा व डाॅ. रागिनी नायक यांचा समावेश आहे.
ही समिती चिंतन शिबिरातील राजकीय प्रस्ताव तयार करण्याचे, तसेच याबाबतच्या विचार मंथनाचे संयाेजन करेल. अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीने अलीकडच्या काळात अशाेक चव्हाण यांच्यावर साेपवलेली ही दुसरी माेठी जबाबदारी आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम ही चार राज्य व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणूनही चव्हाण यांना नेमण्यात आले हाेते.