नांदेड शहरात काँग्रेस-भाजपात रंगले बॅनरयुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:02 AM2018-10-25T01:02:27+5:302018-10-25T01:03:11+5:30
नांदेडात अशाप्रकारे पहिल्यांदाच दोन राजकीय पक्षांमध्ये बॅनरयुद्ध रंगल्याचे दिसून येत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जनसामान्यांचे हाल करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहरात बॅनर लावले होते़ या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने वेगवेगळ्या वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या बातम्यांचे कात्रण असलेले बॅनर लावले आहे़ त्यावर जोरदार हल्ला करीत काँग्रेसने आणखी बॅनर लावत भाजपावर उपहासात्मक टीका केली़ नांदेडात अशाप्रकारे पहिल्यांदाच दोन राजकीय पक्षांमध्ये बॅनरयुद्ध रंगल्याचे दिसून येत आहे़
माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यभर भाजपाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे़ गुरुवारी ही यात्रा नांदेडात येणार आहे़
त्यानिमित्ताने काँग्रेसने शहरभर बॅनर लावले आहेत़ त्या माध्यमातून भाजपावर कडाडून हल्ला चढविण्यात आला आहे़ काँग्रेसने लावलेले हे बॅनर जनसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत़ त्यात आता भाजपानेही त्यापुढेच आपले बॅनर लावले आहे़
काँग्रेसला बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला आहे़ त्यामध्ये केलेल्या गटबाजीच्या उल्लेखाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते़ त्यानंतर दोनच तासांत काँग्रेसने दुसरे बॅनर लावले़ या बॅनरची मात्र दिवसभर चर्चा होती़
काँग्रेसने लावलेल्या बॅनर्समध्ये हिटलरचा फोटो टाकला असून देशात गांधी विचाराचा गळा दाबल्याचे नमूद केले़ सरकार दलाल, ज्येष्ठांचे हाल, जनता बेहाल व भाजप नेते मालामाल असा मथळा करण्यात आला होता़ त्यासोबतच यशवंत सिन्हा आणि स्थानिक नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला दिलेल्या घरच्या अहेराच्या बातमीचे कात्रणही टाकण्यात आले होते़ एम.जे.अकबर, राम कदम, बिपिन शर्मा यांच्या अनैतिकतेच्या वर्तनाचा या बॅनर्सवर उल्लेख करतानाच अमित शहा आणि ओवेसी यांची सिक्रेट डील, नोटबंदीनंतर अमित शहांच्या बँकेत जमा झालेले पाचशे कोटी रुपये या बातम्यांचा उल्लेख करीत, भाजपातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एकनाथ खडसे हे कसे अडगळीला गेले़ यावर भाष्य करण्यात आले होते़ काँग्रेस आणि भाजपात रंगलेले हे बॅनरयुद्ध शहरवासियांसाठी मात्र चर्चेचा विषय झाले होते़