नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 06:00 PM2024-11-14T18:00:43+5:302024-11-14T18:01:06+5:30
पाच मतदारसंघात मात्र राष्ट्रीय पक्षाची प्रादेशिक पक्षाशी लढत; वंचित बहुजन पक्षाने जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.
नांदेड- काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन राष्ट्रीय पक्ष असून नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघांपैकी तब्बल ४ मतदारसंघात काँग्रेस-भाजप या दोन राष्ट्रीय पक्षात असली टस्सल बघायला मिळणार आहे. भोकर, नायगाव, देगलूर व मुखेड या चार मतदारसंघात हे दोन राष्ट्रीय पक्ष आमने-सामने असून यांच्यात थेट लढत होणार आहे. उर्वरित मतदारसंघात मात्र राष्ट्रीय पक्षाची इतर प्रादेशिक पक्षांशी लढत होणार आहे.
किनवट मतदारसंघात भाजपाचे भीमराव केराम व जिल्ह्यात एकमेव तुतारी चिन्हावर निवडणूक लढवित असलेले उमेदवार प्रदीप नाईक यांच्यात लढत होत आहे. हदगावमध्ये शिंदेसेनेचे बाबुराव कदम व काँग्रेसचे माधवराव जवळगावकर यांच्यात लढत होत आहे. नांदेड उत्तरात मैत्रीपूर्ण लढत होईल. या मतदारसंघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार, शिंदेसेनेकडून बालाजी कल्याणकर व उद्धवसेनेकडून संगीता पाटील निवडणूक लढवित आहेत. याठिकाणी महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड दक्षिणमध्ये शिंदेसेनेचे आनंद तिडके व काँग्रेसचे मोहन हंबर्डे यांच्यात सामना रंगणार आहे. याच मतदारसंघात भाजपाचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते यांचे दोघांनाही तगडे आव्हान असणार आहे. लोह्यात जिल्ह्यातील एकमेव घड्याळ चिन्हावर प्रतापराव चिखलीकर उभे आहेत. उद्धवसेनेकडून एकनाथ पवार तर शेकापकडून आशा श्यामसुंदर शिंदे रिंगणात आहेत.
वंचितचे नऊही मतदारसंघात उमेदवार
वंचित बहुजन पक्षाने जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने किनवट व लोहा मतदारसंघात उमेदवार दिला नाही. किनवटमध्ये प्रदीप नाईक तुतारीवर तर लोह्यात उद्धवसेनेचे एकनाथ पवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. भाजपाने हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण व लोह्यात उमेदवार दिला नाही. हदगाव, नांदेड उत्तर व दक्षिणमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. तर लोह्यात प्रतापराव चिखलीकर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. बहुजन समाज पार्टीने लोहा, नायगाव व देगलूर मतदारसंघात उमेदवार उभा केला नाही. उर्वरित ६ मतदारसंघात बसपा निवडणूक लढवित आहे. मनसेने केवळ भेकर आणि नांदेड उत्तर मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला आहे. लोहा, नायगाव व मुखेडमध्ये शेकापचे ३ उमेदवार रिंगणात आहेत.
पक्षांचे उमेदवार
काँग्रेस - ०७
भाजप - ०५
शिंदेसेना- ०३
उद्धवसेना- ०२
बीएसपी- ०६
वंचित- ०९
मनसे- ०२
राष्ट्रवादी काँग्रेस- ०१
शरदचंद्र पवार- ०१
भोकर
श्रीजया चव्हाण- भाजपा
तिरुपती (पप्पू) कोंढेकर- काँग्रेस
नायगाव
डॉ. मीनल खतगावकर- काँग्रेस
राजेश पवार- भाजपा
देगलूर
जितेश अंतापूरकर- भाजपा
निवृत्ती कांबळे- काँग्रेस
मुखेड
तुषार राठोड- भाजपा
हनुमंत पाटील बेटमोगरेकर- काँग्रेस