नांदेड : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडात लोकसभा उमेदवारीवरुन काँग्रेस आणि भाजपा दोघेही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत़ काँग्रेसकडून खुद्द प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़अमिता चव्हाण तर भाजपाकडून आ़प्रताप पाटील चिखलीकर, मीनल खतगावकर यांच्या नावाची चर्चा सुरु असली तरी दोन्ही पक्षांनी उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे़ त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़देशभरात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे़ राज्यासह देशभरातील अनेक मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे़ परंतु, नांदेड जिल्ह्यात मात्र उमेदवारीबाबत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली आहे़दोन्ही पक्ष एकमेकांचा उमेदवार कोण असतील या प्रतीक्षेत आहेत़ काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आ़अमिताताई चव्हाण यांचे नाव फायनल करुन पक्षश्रेष्ठींकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता़ त्यानंतर काही दिवसांपूर्वीच खुद्द अशोकराव चव्हाण यांनी मीही उमेदवार असू शकतो असे वक्तव्य केले होते़ त्यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली होती़ तर दुसरीकडे भाजपामध्ये जुने आणि नवे पदाधिकारी असा वाद रंगला आहे़ भाजपाचा एक गट काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेला होता़ या भेटीत त्यांनी भाजपाचे निष्ठावंत धनाजीराव देशमुख यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती़तर मुंबई येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीनंतर आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि मीनल खतगावकर या दोघांना पक्षाने उमेदवारी दाखल करण्यासाठीची कागदपत्रे काढून ठेवण्यास सांगितले होते़ त्यामुळे या दोघांपैकी एक जण उमेदवार असेल अशीही चर्चा रंगली होती़ अशोकराव चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीत मनसुबा होता़ परंतु, चव्हाणांनी विरोधकांना अस्मान दाखविले होते़ त्यामुळे भाजपाकडून यावेळी सावध भूमिका घेतली जात आहे़ नांदेडचा पारा सध्या ४० अंशावर गेला आहे़ त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे मात्र लोकसभेची रणधुमाळी नांदेडात सध्यातरी थंडच असल्याचे दिसून येते़ त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सर्वांनाच नावांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे़उमेदवार कोण? यावर रंगताहेत गप्पांचे फडलोकसभा निवडणुकीसाठी नांदेडातून मॅनेज उमेदवाराला संधी देवू नका असे साकडे प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांना घातले होते़ त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उमेदवार कोणीही असो प्रचार करा असा सल्ला त्यांना दिला होता़ त्यानंतर भाजपात निष्ठावंत कोण अन् मॅनेज कोण? यावर बराच खल झाला होता़ तर दुसरीकडे खा़अशोकराव चव्हाण की आ़अमिता चव्हाण या दोन नावांची चर्चा सुरु आहे़ गप्पांच्या फडामध्ये काँग्रेसकडून अमुक उमेदवार असेल तर भाजपाकडून तमुक उमेदवार असेल अशी चर्चा रंगत आहे़