नांदेडच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या दिक्षा धबाले यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 05:06 PM2019-06-01T17:06:56+5:302019-06-01T17:12:07+5:30
काँग्रेसच्या धबालेंना ७० ते भाजपच्या बेबीताई गुपिलेंना ४ मते
नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या दिक्षा कपिल धबाले यांची शनिवारी ७० विरुद्ध ४ अशा मतफरकाने निवड झाली. त्यांनी भाजपाच्या बेबीताई गुपिले यांचा दणदणीत पराभव केला.
महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिट अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या दिक्षा धबाले यांना ७० तर भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना ४ मते मिळाली. धबाले यांनी एकतर्फी विजय मिळविला.महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ८१ पैकी ७४ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. भाजपाचे ६, शिवसेना-१ आणि अपक्ष १ असे पक्षीय बल महापालिकेत आहे.
शनिवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत एकूण सात सदस्य अनुपस्थित राहिले. त्यात काँग्रेसचे चार सदस्य तर भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एकमेव सदस्य अनुपस्थितीत होता. अनुपस्थितीत सदस्यांमध्ये काँग्रेसच्या दिपाली मोरे, संगीता बिरकले, आयशा बेगम, साबिया बेगम तर भाजपाच्या इंदुबाई घोगरे, दिपकसिंह रावत आणि शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता.
काँग्रेसच्या निर्णयाप्रमाणे महापालिकेचे महापौरपद हे सव्वा वर्षासाठी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार शिलाताई भवरे यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. ३० मे रोजी काँग्रेसकडून दिक्षा धबाले यांचा एकमेव अर्ज आला होता तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून बेबिताई गुपिले यांनी अर्ज दाखल केला होता.