नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने सहज वाटणाऱ्या नांदेड लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, चार आमदारांसह दोन राज्यसभा सदस्यांची फौज प्रतापराव चिखलीकर यांच्यासोबत असतानाही त्यांचा ५९ हजार ४४२ पराभव झाला. सत्ताधारी भाजपसह घटक पक्षाच्या ताब्यातील विधानसभा मतदार संघातील पिछेहाट या आमदारांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
मोदी लाटेत २०१४ मध्ये महाराष्ट्रात केवळ नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा झेंडा फडकला होता आणि या दोन्ही जागेच्या विजयाचे श्रेय अशोकराव चव्हाण यांना मिळाले होते. दरम्यान, २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन होऊन अशोकरावांचा पराभव झाला. तद्नंतर २०२४ मध्ये अशोकराव चव्हाण हेच लोकसभेचे उमेदवार असतील, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात होता. परंतु, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव यांच्या हातात भाजपने कमळ दिले अन् तिथेच नांदेडकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. चव्हाण यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी राज्यसभा सदस्य केले. परंतु, नांदेडकरांना चव्हाणांचा भाजप प्रवेश आवडला नाही. त्यातून मुस्लिम, दलित समाजामध्ये निर्माण झालेली संतापाची ठिणगी शेवटपर्यंत राहिली. दरम्यान, चिखलीकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारत अशोकराव चव्हाण यांनी पायाला भिंगरी लावून गावागावात प्रचार केला अन् मतदारांना भावनिक सादही घातली. मात्र, मतदार त्यांच्या भावनिक आवाहनाला बळी पडला नाही.
ग्रामीण भागातील मराठा समाजाने अशोकराव चव्हाण यांना थेट चले जाव... चा इशारा देत गावातून बाहेर काढले. त्याचाही फटका भाजपला बसला. भाजपविरोधी असलेली मराठा समाजाची नाराजी चिखलीकर यांना भोवली. त्यात विद्यमान आमदारांनी ग्राऊंड लेव्हलला जाऊन फारशी मेहनत घेतली नसल्याचेही पहायला मिळाले. उलटपक्षी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासोबत एकमेव नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे प्रचारात उतरले होते. परंतु, त्यांनी स्वत:ची निवडणूक समजून मेहनत घेत त्यांच्या मतदार संघात काँग्रेसला १८ हजार ९४ मतांची लीड दिली.
विधानसभेला नवतरूणांना मिळेल संधीअशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे दुसऱ्या फळीतील काँग्रेसचे पुढारी आता फार्मात आले आहेत. त्याचबरोबर तरूण नेतृत्वांनी जीवाचे रान करून काँग्रेसला विजयी केले. त्यामुळे आतापासूनच विधानसभेच्या निवडणुकांचे ही अनेकांना वेध लागले आहेत. जिल्ह्यातील बडे नेते भाजपमध्ये असल्याने आता महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटातील नवख्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना भविष्यात विधानसभेची लॉटरी लागू शकते. तर भाजपचे कमळ घेतलेले अनेक दिग्गज स्वगृही देखील परतू शकतात.
शिंदेसेना आमदारांच्या मतदार संघात पिछेहाटनांदेड उत्तर विधानसभा मतदार संघ हा शिंदेसेनेच्या ताब्यात आहेत. परंतु, याठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना केवळ ६४ हजार ५४० मते असून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना तब्बल १ लाख ५ हजार १३५ मते मिळाली. याठिकाणी एकूण ४० हजार ५९५ मतांनी महायुतीच्या उमेदवारांची पिछेहाट झाली. भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या नायगाव मतदार संघातही काँग्रेसला ४ हजार ३८२ मताधिक्य मिळाले. परंतु, वसंतराव हे मुळचे नायगाव तालुक्याचे असल्याने त्याचाही प्रभाव येथे पडला. मात्र, आमदार कल्याणकर यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुखेडमध्ये भाजपचे आमदार डॉ. तुषार राठाेड यांनी प्रचारात उडी घेतल्याने भाजपला ३ हजार ९९७ मतांची आघाडी आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय मिळालेली मतेउमेदवार - भोकर - नांदेड - उत्तर नांदेड- दक्षिण नायगाव- देगलूर - मुखेडवसंतराव चव्हाण (काँग्रेस)- ८३४९० - १०५१३५- ९८६०६- ८९८७३ - ८३६०६ - ७४१५५प्रताराव चिखलीकर (भाजप)- ८४३३१ - ६४५४० - ७२५१२ - ८५४९१ - ८२४२६ - ७८१५१