नांदेडात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:58 AM2018-10-06T00:58:10+5:302018-10-06T00:58:35+5:30
प्रवाशांशी संबंधित रेल्वेच्या सर्वच निर्णयासंदर्भात तसेच नवीन रेल्वे सुरू करताना त्या त्या भागातील खासदारांना विश्वासात घेणे, माहिती देणे, कार्यक्रम पत्रिकांवर नाव टाकणे गरजेचे असताना दम रेल्वेकडून सापत्न वागणूक देत स्थानिक खासदारांना डावलले जात आहे़ याच कारणावरून शुक्रवारी जम्मूतावी एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्रवाशांशी संबंधित रेल्वेच्या सर्वच निर्णयासंदर्भात तसेच नवीन रेल्वे सुरू करताना त्या त्या भागातील खासदारांना विश्वासात घेणे, माहिती देणे, कार्यक्रम पत्रिकांवर नाव टाकणे गरजेचे असताना दम रेल्वेकडून सापत्न वागणूक देत स्थानिक खासदारांना डावलले जात आहे़ याच कारणावरून शुक्रवारी जम्मूतावी एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते़
नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा, नांदेड- मुंबई- नांदेड एक्स्प्रेस सुरू करावी यासह विविध मागण्यांचे फलक उंचावत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासन व सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली़ यावेळी भाजप कार्यकर्त्यांनीदेखील मोदी मोदी़़़ अशा घोषणा दिल्या़ यावेळी दोन्ही बाजूंकडील कार्यकर्ते आमनेसामने आले होते़ पोलिसांनी लगेच मध्यस्थी करीत कार्यकर्त्यांना दूर केले़
नांदेड-जम्मूतावी एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल शुक्रवारी नांदेडात आल्या होत्या़ दुपारी रेल्वेस्टेशनवर त्यांचे आगमन होण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी निमंत्रणाच्या वादावरुन आंदोलनाची तयारी केली होती़ मंत्री बादल यांचे रेल्वेस्टेशनवर आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत रेल्वे प्रशासन, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या़ यावेळी किशोर भवरे, विजय येवनकर, उपमहापौर विनय गिरडे, संतोष पांडागळे, शमीम अब्दुला, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, बालाजी सूर्यवंशी, अब्दुल गफ्फार, विरेंद्रसिंघ गाडीवाले उपस्थित होते़
उद्घाटन सोहळ्यास शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष भाई गोबिंदसिंघजी लोगोंवाल, दिल्ली शिरोमणी अकाली दलाचे नेते आ़मनजिंदसिंघ सिरसा, दिल्ली गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजितसिंघ जी़ के़, आ़ डी़ पी़ सावंत, महापौर शीला भवरे, गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार तारासिंघ, प्रशासकीय अधिकारी डी़ पी़ सिंघ, स़रविंदरसिंघ बुंगई, स़ईकबाल सिंघ, चैतन्यबापू देशमुख, नगरसेविका गुरप्रितकौर सोढी आदी उपस्थित होते़
वेळापत्रकावर काँग्रेसची नाराजी
जम्मूसाठी रेल्वे सुरू करण्यावर कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही़ परंतु, मोदी सरकारने यातही राजकारण केले असून केवळ मध्य प्रदेशातील प्रवाशांना फायदा होईल, असे रेल्वेगाडीचे वेळापत्रक बनविले़ निवडणुकीचे राजकारण करणाऱ्या मोदी सरकारने रेल्वे प्रशासनाला हाताशी धरून स्थानिक खासदारांना डावलण्याचा जो उद्योग केला आहे़ तो संतापजनक असून याविरोधात काँग्रेसने आंदोलन केले़ पत्रिकेत खासदारांचे नाव टाकणे हा राजशिष्टाचार असताना त्याचे पालन केले नाही, म्हणून कार्यक्रमस्थळी निदर्शने केली. ते नव्या रेल्वेगाडीसाठीचे नसून रेल्वे प्रशासनाविरोधात असल्याचे सावंत यांनी सांगितले़ सदर राज्यांमध्ये लवकरच निवडणुका होणार असून आचारसंहितेच्या आधी ही गाडी सुरू करून त्या भागातील नागरिकांना खूश करण्याचा मोदी सरकारचा हा डाव असल्याचे आरोप त्यांनी केला़ जम्मूतावी एक्स्प्रेसमध्ये केवळ २५ प्रवाशांनी रिझर्वेशन केले होते़ २२ डबे असलेली वातानुकूलित गाडी विनाप्रवासी धावली़ प्रशासनाने नियोजनपर्ण उद्घाटन केले असते तर निश्चितच शेकडो प्रवाशांना लाभ घेता आला असता़
मोदींचा जयघोष़़़
काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही मोदी मोदीचा जयघोष केला़ यावेळी चैतन्यबापू देशमुख, दिलीपसिंघ सोडी, बालासाहेब बोकारे, संदीप पावडे, विजय गंभिरे, संतोष वर्मा, शितल खांडील, व्यंकट मोकले, अभिषेक सौंदे आदींची उपस्थिती होती़ यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने येवून घोषणाबाजी करीत होते़ त्याचवेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दूर केले़