नांदेड : नांदेड लोकसभेसाठी आठ दिवसांनी मतदान होणार असून प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. भाजपच्या गोटात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण येऊनदेखील काँग्रेसने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. एकतर्फी वाटणारी निवडणूक आता दुरंगी झाली आहे.
२०१९ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव करून प्रतापराव चिखलीकरांनी नांदेडात भाजपचे कमळ फुलविले होते. त्यामुळे पुन्हा अशोकराव हेच लोकसभेच्या रिंगणात राहतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, ऐन लोकसभेच्या तोंडावर अशोकरावांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपशी घरोबा केला. काँग्रेसकडून लोकसभेची तयारी करणाऱ्या डाॅ. मीनल खतगावकर यांनीदेखील हाती कमळ धरले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला कोणीच तगडा विरोध राहिला नसल्याचे बोलले जात होते.
नांदेडातून उमेदवारी कुणाला द्यावी, असा प्रश्न काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पडला होता. परंतु, काँग्रेसमध्ये थांबलेल्या सर्वच नेत्यांनी पूर्वीपासूनच माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे एकमेव नाव पुढे केले आणि त्यांना उमेदवारीही मिळाली. वसंतराव यांच्या प्रकृती आणि वयामुळे ते स्पर्धेत टिकणार नाहीत, असा चंग बांधला जात होता. किंबहुना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत डायलिसिसवर असलेल्या वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी म्हणजे काँग्रेसने अशोकरावांसोबत केलेली सेटलमेंट आहे, असा आरोप केला होता. परंतु, त्याच वसंतराव चव्हाण आणि काँग्रेसने भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मागील निवडणुकीत वंचित दीड लाखांपुढे गेली. परंतु, या निवडणुकीत तसे दिसत नाही. परंतु, गावागावात राजकीय पुढाऱ्यांना होणाऱ्या विरोधाचे पर्यावसन कोणाच्या मतदानाचा टक्का वाढविण्यात होते, हे येणारा काळच सांगेल.
मराठा मतदार जाणार कुणाकडे?मराठा आरक्षणाचा लढा अनेक वर्षांचा असला तरी मागील वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निर्माण झालेली एकजूट पहिल्यांदाच झाली. जरांगे पाटील यांनी ना महाविकास आघाडी ना महायुती, अशी भूमिका घेतली. स्थानिक पातळीवर मराठा आरक्षणाच्या बाजूने असणाऱ्यांना साथ द्या, अन् विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाडा, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे मराठा समाज या लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार, त्यावरही विजय-पराजयाचे गणित अवलंबून आहे.
काँग्रेसला नव्याने पोहोचावे लागणार प्रत्येक गावातनांदेडमध्ये प्रतापराव विरूद्ध वसंतराव अशी सरळ लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी आपापल्या कुटुंबीयांसह सगे सोयरे, पाहुणे यांच्या वेगवेगळ्या टीम, मित्र परिवार आणि संस्थांमधील कर्मचारी यांनाही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. परंतु, प्रतापराव चिखलीकर यांच्याकडे संपूर्ण लोकसभा मतदार संघात जसे कार्यकर्त्यांचे जाळे आणि नियोजन आहे, तसे नियोजन काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्याकडे नसल्याचे दिसत आहे. पूर्वी अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असल्याने गावागावात काँग्रेसचे भरगच्च कार्यकर्ते होते. आजघडीला चित्र वेगळे असून अशोकराव भाजपमध्ये आहेत. त्यात स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवडी करणे बाकी आहे. परिणामी भाजपसमोर आव्हान उभे केलेल्या वसंतरावांना विजयासाठी लोकसभा कार्यक्षेत्रातील सहा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात पोहोचणेही गरजेचे आहे.