हे माझे पहिले बाळंतपण नाही, सरकार येते अन् जाते; अशोक चव्हाणांची मिश्कील टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:48 AM2022-08-02T11:48:35+5:302022-08-02T11:49:14+5:30
सध्याचे सरकार म्हणजे विकासकामांना स्थगिती देणारे सरकार आहे, अशोक चव्हाणांची टीका.
मालेगाव (जि. नांदेड) : जे काम मंजूर झाले त्याला स्थगिती, ज्याची वर्कऑर्डर झाली नाही त्याला स्थगिती अशाप्रकारे स्थगिती देण्याचा सपाटा सुरू आहे. सरकार येते अन् जाते. मीही मंत्री, मुख्यमंत्री होतो. नंतर राजीनामा दिला. त्यामुळे माझे हे काही पहिले बाळंतपण नाही, अशी मिश्कील टिप्पणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. सरकार कुणाचेही असो, परंतु जनतेची कामे थांबली नाही पाहिजेत, असेही ते म्हणाले.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील जल जीवन मिशनअंतर्गत सोमवारी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, सध्याचे सरकार म्हणजे विकासकामांना स्थगिती देणारे सरकार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना निधी वाटप आणि विकासकामात आम्ही कधीही भेदभाव केलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
पक्ष सोडण्याच्या चर्चा निरर्थक
अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अशोक चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, कोण करत आहे चर्चा, चर्चांना महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया देत चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चा उडवून लावल्या.
अशोक चव्हाण हे बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहोचले होते. त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर ४ ते ५ आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.