शिवराज बिचेवार
नांदेड- देशात सध्या नोटावर फोटो लावण्याच्या विषय सुरु आहे. परंतु या विषयाला तोंड फोडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बोलविता धनी कोण आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच अगोदर रुपयाचे अवमुल्यन थांबायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पटोले हे शुक्रवारी नांदेडात एका कार्यक्रमानिमित्त आले होते.
यावेळी ते म्हणाले,स्वतः उच्चशिक्षित असलेले अन् दिल्लीसारख्या केंद्र शासीत राज्याचे मुख्यमंत्री नोटावर देवी-देवतांचे फोटो लावण्याची मागणी करतात हे आश्चर्य आहे. परंतु त्या अगोदर रुपया वाचला पाहिजे. देशाच्या अर्थमंत्री डॉलर मजबूत होतोय, त्यामुळे रुपया घसरतोय असे बेजाबदार उत्तर देतात. नोटांवर कोणाचे फोटो टाकण्याला आमचा विरोध नाही. परंतु रुपयाच जर मेला तर यावर कुणी बोलण्यास तयार नाही. आमची मुल-मुली परदेशात शिकायला आहेत. त्यांचे शिक्षण महाग झाले आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारखे विषय आहेत. परंतु या सर्वांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात येणारे तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेले. त्यात वेदांता, रायगड आणि आता टाटा यांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार काम करीत आहे असे दिसत आहे. या विषयी आम्ही सोमवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही पटोले म्हणाले. राज्यात सत्तेत आलेल्या सरकारच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. राज्य सध्या अधोगतीला जात आहे.
केजरीवाल भाजपाची बी टिम
देशात बेराेजगारी, महागाई वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु नोटावर कोणाचे फोटो असावे हा विषय पुढे आणून त्यापासून लक्ष वळविण्यात येत आहे. केजरीवाल ही भाजपाची बी टिम असून ते त्याप्रमाणे काम करीत आहेत. राज्यातील ईडीचे मुख्यमंत्री यांनी मोदी-शहाचे हस्तक असल्याचे कबुली दिली आहे. त्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्र लुटून त्याची वाताहत करण्याचे काम सुरु आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"