कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला, जयराम रमेश यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 04:45 PM2022-11-08T16:45:51+5:302022-11-08T16:46:28+5:30

Krishnakumar Pandey: भारत जोडो यात्रेच्या ६२ व्या दिवशी सकाळी एक दुःखद घटना घडली. सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Congress lost a staunch worker in Krishnakumar Pandey's death, Jairam Ramesh paid tribute | कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला, जयराम रमेश यांनी वाहिली श्रद्धांजली

कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला, जयराम रमेश यांनी वाहिली श्रद्धांजली

Next

नांदेड -भारत जोडो यात्रेच्या ६२ व्या दिवशी सकाळी एक दुःखद घटना घडली. सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पांडे यांच्या निधनाने काँग्रेसचा एक कट्टर कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पांडे यांच्या निधनाची माहिती पत्रकारांना देताना जयराम रमेश म्हणाले की, कृष्णकुमार पांडे हे सकाळी भारत जोडो यात्रा सुरु होताच तिरंगा हातात घेऊन मी व दिग्विजयसिंह यांच्यासोबत चालत होते, काही वेळानंतर त्यांनी तिरंगा झेंडा दुसऱ्या कार्यकर्त्याकडे देऊन मागून चालत असताना अचानक खाली कोसळले, त्यांना तातडीने हॉस्पिटलला पाठवण्यात आले पण त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कृष्णकुमार पांडे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसचे पाईक राहिले. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ते के. के. पांडे नावाने प्रसिद्ध होते, त्यांनी महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. भारत जोडोच्या कॅम्पमध्ये खा. राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री व शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

खा. राहुल गांधी यांनी कृष्णकुमार पांडे यांच्या मुलांची भेट घेऊन सांत्वन केले. “कृष्णकुमार पांडे यांचे निधन संपूर्ण काँग्रेस परिवारासाठी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती मी सहवेदना प्रकट करतो. जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या हातात तिरंगा होता. देशासाठी त्यांचे समर्पण सदैव प्रेरणा देत राहिल”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

कृष्णकुमार पांडे यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असे जयराम रमेश म्हणाले. 
कृष्णकुमार पांडे यांच्या निधनामुळे आजची पदयात्रा कोणताही गाजावाजा न करता, शांततेने पुढे निघाली तसेच संध्याकाळी भोपाळा गावात शोकसभा घेण्यात आली.

Web Title: Congress lost a staunch worker in Krishnakumar Pandey's death, Jairam Ramesh paid tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.