- श्रीनिवास भोसलेनांदेड : काँग्रेसवाले देशामध्ये डॉ. बाबासाहेबांचे नाही तर त्यांचे स्वतंत्र संविधान चालवायाला पाहत आहेत. तसा प्रयत्न आणीबाणीमध्ये केला होता. आता वेगळे पुस्तक छापून संविधानाची थट्टा उडविण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला आहे. त्यांनी ७५ वर्ष दोन संविधान चालविण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी केले. ३७० ची भिंत उभारण्याचे काम त्यांनी केले. पण, आम्ही सत्तेत आल्यानंतर या कलमाला जमीनीत गाडण्याचे काम केले,असेही मोदी म्हणाले.
नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, मंत्री हेमंत पाटील, खासदार डॅा.अजित गोपछडे, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर, लोहा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आदींची उपस्थिती होती.
दिल्लीत मोदी सरकार आले, पण या आनंदात नांदेडचे फुल नव्हते. त्यामुळे आता मी दिल्लीला नांदेडमधून कमळाचे फुल पाठविण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. तुमच्याकडून मोदीसाठी ही मदत मागत असून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरियाणाच्या निवडणुकीत पहिल्यापेक्षा जास्त नाही तर इतिहासात सर्वाधिक जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार पाहिजे, असेही ते म्हणाले.
मराठवाड्यावर सर्वाधिक अन्याय काँग्रेसवाल्यांनी केला आहे. परंतु, हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमी वैतरनेतून पाणी आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे. दमनगंगा, वैतरना, गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला लाभ होईल. त्यासाठी विविध सिंचन योजनांना मंजूरी दिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात विविध उद्योग उभारण्यासाठी ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हजारो युवकांच्या हातांना काम मिळले.
मराठवाडा दुष्काळमुक्त होईलमराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे मुळ काँग्रेस असून त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या सुखदुखाची कधीच परवा केली नाही. मागील दहा वर्षात भाजप, महायुतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला. त्यातही अडीच वर्ष बिघाडी सरकारने या योजनांना ब्रेक लावण्याचे काम केले. आज नदी जोड प्रकल्प आणि मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त होईल तर ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून येथे हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.